नवी दिल्ली - राजधानीत रेल्वे स्थानकावर शनिवारी झालेल्या चेंगराचेंगरीवरून (New Delhi stampede) काँग्रेसनं केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारनं पारदर्शकता दाखवून आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी काँग्रेसनं मागणी केली.
नवी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा मृत्यू (NDLS stampede) झाला. सुमारे १,५०० जनरल डब्याची तिकिटे विकली होती. अचानक गर्दी उसळल्यानं रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. या दुर्घटनेचे संपूर्ण देशात राजकीय पडसाद उमटले आहेत.
काँग्रेसची सरकारवर टीका-दिल्लीत रेल्वे स्थानकावरील मृत आणि जखमींची संख्या लवकरात लवकर जाहीर करावी. बेपत्ता लोकांची ओळखदेखील जाहीर करावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून केली. जखमींना त्वरित वैद्यकीय मदत द्यावी. तसेच पीडिताच्या कुटुंबियांना आधार देण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. पीडितांच्या कुटुंबियांबद्दल आम्ही दु:ख व्यक्त करत आहोत. जखमींना त्वरित वैद्यकीय उपचार देण्यात यावेत, अशी काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जून खर्गे यांनी अपेक्षा व्यक्त केली. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशीही त्यांनी मागणी केली. स्टेशनवरून दुर्घटनेचे येणारे व्हिडिओ अत्यंत हृदयद्रावक आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील मृत्यूंच्या बाबतीत सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारनं केलेला प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षांनी केली. प्रचंड गर्दी हाताळण्यासाठी चांगल्या व्यवस्था करण्याची गरज आहे. ही दुर्दैवी घटना रोखता आली असती, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी व्यक्त केलं.