कोल्हापूर Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांचा आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. बेळगाव आणि कारवार या लोकसभा मतदारसंघात समिती आपला उमेदवार देणार आहे. कारवार लोकसभा मतदारसंघातून एकीकरण समितीचे निरंजन सरदेसाई यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. "यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठी भाषिकांच्या मताधिक्यावर विजयी होणार," असा विश्वास निरंजन सरदेसाई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रलंबित :गेली 67 वर्ष महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रलंबित आहे. या सीमावादाचा खटला अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यानं मराठी भाषिकांवर कानडी सरकारकडून होणारा अन्याय दूर झालेला नाही. एकेकाळी बेळगावसह सीमा भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा दबदबा असताना गेल्या काही दिवसात बेळगाव महानगरपालिका, लोकसभा पोटनिवडणूक यामध्ये एकीकरण समितीला म्हणावं तसं यश मिळवता आलं नाही. मात्र आता एकीकरण समितीची सूत्र तिसऱ्या पिढीकडं गेली आहेत. यामधूनच बेळगाव आणि कारवार या दोन लोकसभा जागा लढवण्याचा निर्णय एकीकरण समितीनं घेतला आहे. यातील कारवार जागेवर एकीकरण समितीचे माजी आमदार निळकंठ सरदेसाई यांचे पुतणे आणि खानापूर तालुका एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष निरंजन सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे. "कारवार लोकसभा मतदारसंघात असलेल्या 4 लाख मराठी भाषिकांच्या मतांवर देशाच्या सर्वोच्च सभागृहात मराठी भाषिकांच्या व्यथा मांडता येतील, असा विश्वास निरंजन सरदेसाई यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केला.