प्रयागराज:महाकुंभ मेळावा ( Mahakumbh Mela 2025) काही दिवसांवर येऊन ठेपला असताना नागा साधुंची देशभरात चर्चा होत आहे. या नागा साधुंनी परकीयांविरोधात लढाईत भाग घेतल्याचं बोललं जातं. या गुढ वाटणाऱ्या नागा साधुंविषयी जाणून घेऊ.
महाकुंभ २०२५ हा उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये मकर संक्रांतीच्या दिवसापासून म्हणजेच १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा असलेला कुंभमेळा हा १५ किलोमीटरच्या परिघात सुमारे ४५ दिवस चालणार आहे. या महाकुंभ मेळाव्यात येणारे नागा साधू कोण असतात? त्यांना धर्मरक्षक का म्हटलं जाते? याबाबत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, "नागा हा शब्द नागपासून आला आहे. नाग म्हणजे पर्वत. जे हलत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहता त्याला नाग म्हणतात. हे नागा साधू बलवान आणि शक्तीचे प्रतीक आहेत. जो कधीही हालचाल करत नाही. नागा म्हणजे कधीही डगमगत नाही. अशा विचारसणीच्या साधुंना नागा साधू म्हटलं जाते".
नागा साधू नग्न का राहतात? जेव्हा माणूस संन्यास घेतो तेव्हा तो सर्वकाही गोष्टींचा त्याग करतो. त्यामुळे तो पूर्णपणे नग्न होऊन उत्तरेकडे हिमालयाकडे निघतो. यावेळी गुरू त्याला थांबवून कमरेला वस्त्र देतात. ज्ञानप्राप्ती ध्यान करण्यासाठी आज्ञा देतात. गुरु थांबवित असल्यानं संन्यासी थांबतात. अन्यथा, त्यांना संन्यास घेण्यासाठी पूर्णपणे नग्न होऊन हिमालयात जायचे असते. जे भिक्षू कपड्यांशिवाय राहतात त्यांना नाग म्हणतात. त्यांना दिगंबर असेही म्हणतात. सनातन धर्मात नागा साधू हे संपूर्ण जीवनात देवाच्या भक्तीत मग्न राहतात. ते कधीही कपडे घालत नाहीत.