नवी दिल्ली : ऐन दिवाळीत महागाई आणखी वाढणार आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पहाटे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. हे दर सुमारे 62 रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर वाढवले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दिल्लीतील 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर हा 1802 रुपये आहे. यापूर्वी हा गॅस सिलिंडर दिल्लीत 1,740 रुपयांना मिळत होता. तर देशाची आर्थिक राजनाधी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडर 1,754 रुपयांना मिळणार आहे. यापूर्वी मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,692.50 रुपये होती. कोलकातामध्ये नवीन दरानुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1911.50 रुपये असणार आहे. गुरुवारपर्यंत हाच सिलिंडर 1,850.50 रुपयांना विकला जात होता. चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,964 रुपये झाली आहे. यापूर्वी या गॅस सिलिंडरचा दर 1,903 रुपये होता.
दोन महिन्यात गॅस सिलिंडरचे कसे होते दर-सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1691 रुपये होती. कोलकात्यात 1802 रुपये, मुंबईत 1644 रुपये आणि चेन्नईत 1855 रुपये दर होता. तर ऑगस्टमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 1652.50 रुपये, कोलकातामध्ये 1764.50 रुपये, मुंबईत 1605 रुपये आणि चेन्नईमध्ये 1817 रुपये होती.
घरगुती गॅस सिलेंडरचे दर स्थिर-सरकारी तेल कंपन्यांनी 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर 'जैसे थे' ठेवले आहेत. हा सिलिंडर अजूनही 2023 च्या किमतीत ग्राहकांकरिता उपलब्ध आहे. दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 803 रुपये, मुंबईत 802.50 रुपये, कोलकात्यात 829 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. यापूर्वी ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी झाल्या होत्या.
- उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांकरिता हा गॅस सिलिंडर 603 रुपयांना उपलब्ध आहे. दिवाळीचा सण असल्यानं काही राज्यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा-
- गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट: आई मुलीसह मुलाचा करुण अंत; ऐन दिवाळीत कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
- सरकार गॅसवर? 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने'त सावळा गोंधळ, लाभार्थ्यांना लाभ घेताना नाकेनऊ