नवी दिल्ली Lok Sabha Election Results 2024 Key Candidates : लोकशाही असलेला जगातील सर्वात मोठा देश अशी भारताची ओळख आहे. देशभरात आज (4 जून) लोकसभा मतदान मोजणी केली जाणार असून लवकरच निकाल जाहीर होणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आजच्या निकालावर अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य निश्चित होणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महत्त्वाच्या मतदारसंघावर आपण नजर टाकूया.
तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक असलेले पंतप्रधान मोदी, भाजपाचे चाणक्य मानले जाणारे अमित शाह आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या मतदारसंघाचे निकाल आज लागणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर नणंदेविरोधात लढणाऱ्या सुप्रिया सुळे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते यश मिळवणार का?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
1. नरेंद्र मोदी : गुजरातमध्ये जन्म झाला असला तरी पंतप्रधान मोदी हे उत्तर प्रदेशमधील वाराणसीमधून निवडणूक लढवित आहेत. यंदा निवडूणन आल्यानंतर त्यांची हॅटट्रीक होणार आहे. कॉमेडियन श्याम रंगीला याने उमेदवारीचा अर्ज भरताना केलेल्या आरोपामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता. काँग्रेस नेते आणि इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय हे मोदी यांच्याविरोधात रिंगणात आहेत. 2014 आणि 2019 मध्ये पंतप्रधान मोदींनी मोठ्या फरकाने लोकसभा निवडणुकीत विजय मिळविला होता.
2. अमित शाह :केंद्रीय गृहमंत्र्यांनी 2019 मध्ये गांधीनगरमधून विजय मिळविला होता. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गांधीनगरमध्ये दुसऱ्यांदा निवडून येण्यासाठी त्यांनी सर्व राजकीय कौशल्य पणाला लावले आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेसच्या उमेदवार सोनल पटेल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उमदेवारीचा अर्ज मागे घेण्याकरिता सत्ताधाऱ्यांनी दबाव टाकल्याचा काही उमेदवारांनी आरोप केला होता. त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेत आला होता.
3. राहुल गांधी :काँग्रेसचे माजी नेते राहुल गांधी हे केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन जागांवरून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. भाजपाच्या स्मृती इराणी यांनी 2019 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये राहुल गांधींचा पराभव केला. वायनाडमध्ये विजय मिळविल्यानंतर राहुल गांधींना संसदेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला हो ता. रायबरेली हा बालेकिल्ला टिकविण्याचं आव्हान राहुल गांधींना पेलवावं लागणार असल्याची चिन्हे आहेत. त्यांच्याविरोधात रायबरेलीमधून भाजपाचे दिनेश प्रताप सिंग आहेत. तर वायनाडमधून भाजपचे के. सुरेंद्रन आणि सीपीआय-एमच्या ॲनी राजा या राहुल गांधी यांना आव्हान देणार आहेत.
4. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार : बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशात सर्वाधिक चर्चेचा ठरलेला मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवित आहेत. राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट बारामतीमधून शरद पवार यांना आव्हान दिले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे. निवडणूक निकालापूर्वीच दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी विजयाचे बॅनर लावले आहे. या निवडणुकीच्या निकालावर शरद पवार आणि अजित पवार यांचे राजकीय भवितव्य निश्चित होणार आहे.
5. शशी थरूर : तिरुअनंतपुरममधून तीन वेळा खासदार राहिलेले काँग्रेस नेते शशी थरूर हे त्यांच्या सफाईदार इंग्रजीमुळे चर्चेत असतात. त्यांच्या विरोधात भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर आणि सीपीआय-एमचे पन्नियान रवींद्रन यांच्याविरुद्ध रिंगणात आहेत. या तिरंगी लढतीत कोण विजयी ठरणार, हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.