नवी दिल्ली Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये राज्यात महाविकास आघाडीनं मोठी मुसंडी मारली आहे. देशातही 'इंडिया' आघाडीनं मोठं यश मिलवलं. मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी इंडिया आघाडीकडं पुरसं पाठबळ नाही. तरी मात्र 'इंडिया' आघाडीनं सत्ता स्थापन करण्याचा दावा केला. दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच दिल्लीत दाखल होत सत्ता स्थापन्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यांचा शपथविधी 8 जूनला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे एनडीए आणि 'इंडिया' आघाडी यांच्यात सत्ता स्थापन करण्यावरुन मोठी चुरस निर्माण झाली आहे.
लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस :लोकसभा निवडणूक निकाल 2024 घोषित झाल्यानंतर आज दिल्लीत एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सरकार स्थापन्याबाबत रणनीती आखण्यात येणार आहे. त्यामुळे आज एनडीएच्या बैठकीत कोणती रणनीती आखण्यात येते, याकडं नागरिकांचं लक्ष लागलं. मंत्रिमंडळानं लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झाल्यानंतर लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडं आज इंडिया आघाडीचीही बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे घटक पक्ष दिल्लीत दाखल होत आहेत. महाराष्ट्रातून शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे हे दोघे इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार आहेत.