वाराणसी Laxmikant Dixit Passed Away :जानेवारी महिन्यात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी असणारे मुख्य पुजारी लक्ष्मीकांत दीक्षित यांचं शनिवारी (22 जून) वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. लक्ष्मीकांत दीक्षित हे मूळचे महाराष्ट्रातील सोलापूरचे असले तरी त्यांचं कुटुंब गेल्या अनेक पिढ्यांपासून काशी येथे वास्तव्यास आहे. वाराणसीच्या विद्वानांमध्ये पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचं अनन्यसाधारण स्थान होतं. पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांच्याकडं काशीच्या विद्वान परंपरेचं प्रतीक म्हणून पाहिलं जात असे.
काकांकडून घेतली वेद आणि विधींची दीक्षा :लक्ष्मीकांत दीक्षित हे वाराणसीच्या मीरघाट येथील सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक होते. काशीच्या राजाच्या मदतीनं सांगवेद महाविद्यालयाची स्थापना झाली. पंडित लक्ष्मीकांत यांची काशीतील यजुर्वेदाच्या उत्तम विद्वानांमध्ये गणना होते. पूजेच्या पद्धतीतही त्यांचं प्राविण्य होतं. लक्ष्मीकांत दीक्षित यांनी त्यांचे काका गणेश दीक्षित भट्ट यांच्याकडून वेद आणि विधींची दीक्षा घेतली होती.