पणजी/डेहराडून- पॅराग्लायडिंग करताना महिला पर्यटक उंच कड्यावरून दरीत कोसळल्यानं शनिवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात पर्यटक महिलेसह तिच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. तर उत्तराखंडमधील धर्मशाळेत पॅराग्लायडिंग अपघातात गुजराती महिलेचा मृत्यू झाला. या दोन अपघातामुळे पॅराग्लायडिंग करताना सुरक्षिततेचा मुद्दा समोर आला.
उत्तर गोव्यात पॅराग्लायडिंग करत असताना दरीत कोसळून २७ वर्षीय महिला पर्यटकसह तिच्या प्रशिक्षकाचा मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी केरी गावात हा अपघात घडल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. पुण्यातील रहिवासी शिवानी डबले आणि त्यांचा प्रशिक्षक सुमल नेपाळी (२६) हे शनिवारी संध्याकाळी केरी पठारावर पॅराग्लायडिंग करत होते. डबले यांनी बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या साहसी क्रीडा कंपनीसोबत पॅराग्लायडिंग करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णयच महिलेसाठी प्राणघातक ठरला आहे. पोलिसातील तक्रारीनुसार, पॅराग्लायडर उंच कड्यावरून उडताच दरीत कोसळले. यावेळी दोघांचा जागीच मृत्यू झाला. भारतीय न्याय संहिताच्या संबंधित तरतुदींनुसार कंपनीचे मालक शेखर रायजादा याच्याविरुद्ध मांद्रेम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उत्तराखंडमध्ये महिला पर्यटकाचा मृत्यू-दुसरा पॅराग्लायडिंगचा अपघात उत्तराखंडमधील धर्मशाळा येथे शनिवारी घडला. गुजरातमधील महिला पर्यटकाचा पॅराग्लायडिंग दरम्यान पडून मृत्यू झाला. तर प्रशिक्षकाला दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिला पर्यटक गुजरातमधील अहमदाबाद येथून धर्मशाळेत पॅराग्लायडिंगकरिता पोहोचली होती. धर्मशाळेतील इंद्रु नाग येथे पॅराग्लायडिंग करताना पायलटसह टेक ऑफ पॉइंटवरून पडून गंभीर जखमी झाली होती. रुग्णालयानं नेताना तिचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या प्रशिक्षकाला वाचविण्यात यश आलं आहे.
पॅराग्लायडिंगला जात असताना या गोष्टीत लक्षात ठेवा( Paragliding safety tips)
- पॅराग्लायडिंग करण्याकरिता तुम्ही रोमांचित होत असताना जीव धोक्यात जाणार तर नाही, याकडं लक्ष देण्याची गरज आहे. कुल्लूमधील पॅराग्लायडिंग ऑपरेटर सुरेश शर्मा आणि विपिन कुमार यांनी सुरक्षेच्या गोष्टी सांगितल्या आहेत. विपिन कुमार यांनी सांगितलं की, पॅराग्लायडिंगचा हा खेळ पूर्णपणे सुरक्षिततेवर अवलंबून असल्यानं सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज आहे.
- जर पर्यटकांना पॅराग्लायडिंग करायचे असेल तर सर्वप्रथम निरभ्र आकाश आणि चांगलं हवामान असण्याची गरज असते.
- उड्डाण करण्यापूर्वी पर्यटकांनी प्रशिक्षकाकडं अथवा पायलटकडं अधिकृत नोंदणी केलेला परवाना आहे का? याची खात्री करावी. पर्यटकाला पायलटचं नाव आणि इतर माहिती विचारण्याचा कायद्यानुसार अधिकार आहे.
- पॅराग्लायडिंग करण्यापूर्वी पर्यटकांनी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. उड्डाण करण्यापूर्वी, पायलट आणि ऑपरेटरकडून सुरक्षिततेशी संबंधित सर्व बाबींची माहिती जाणून घ्या. उदाहरणार्थ, उड्डाण करताना किंवा उतरताना पायांची स्थिती कशी असावी? हवेत असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? याची माहिती घ्या. सेफ्टी बेल्टसह, पॅराग्लायडिंगसाठी वापरली जाणारी उपकरणे व्यवस्थित आहेत का, याची तपासणी करा.