लखनऊ Hathras Satsang Stampede : हाथरस सत्संगात चेंगराचेंगरी होऊन तब्बल 121 भाविकांचा बळी गेला. या अपघाताला जबाबदार असलेला सूरजपाल उर्फ भोलेबाबा हा अद्यापही फरार आहे. सूरजपाल उर्फ भोलेबाबा याच्याबाबतीत आता एक-एक खुलासे होत आहेत. भोलेबाबा उर्फ सूरजपाल हा दुधानं अंघोळ करुन त्या दुधाची खीर बनवून भाविकांना प्रसाद म्हणून वाटत असल्याचा धक्कादाय प्रकार त्याच्या गावातील नागरिकांनं सांगितला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली असून पोलीस सूरजपाल उर्फ भोलेबाबाचा शोध घेत आहेत. तो सापडल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे.
भोलेबाबा दुधानं करायचा अंघोळ त्याच दुधाची बनायची खीर :बहादूर नगर इथल्या एका ग्रामस्थानं सांगितलं की, "पूर्वी भोलेबाबाला दुधानं आंघोळ घालत असत. त्याच दुधापासून खीर बनवली जायची. यानंतर ही खीर भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली. ही बाब गावातील नागरिकांना कळताच त्यांनी विरोध केला. हा प्रकार उजेडात आल्यानंतर नागरिकांनी बाबांपासून अंतर ठेवलं," असंही या गावकऱ्यानं सांगितलं. "बहादूर नगरच्या या आश्रमात शेवटचा सत्संग 2014 मध्ये झाला. यानंतर ना सत्संग होतो ना भोलेबाबा या आश्रमात येतात. मागील 10 वर्षात भोलेबाबा अधूनमधून त्यांच्या गावात येतात. आजही मंगळवारी भाविकांची मोठी गर्दी आश्रमात होत असून बाविक मोठ्या भक्तीभावानं दर्शन घेतात. मात्र हाथरस इथं चेंगराचेंगरी झाल्यानंतर भोलेबाबा यानं मृत आणि जखमींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची प्रकृती विचारायला हवी होती," असं ग्रामस्थांचं मत आहे.