नवी दिल्ली Farmer Protest : सोमवारी शेतकरी संघटनांची सरकारबरोबरची साडेपाच तासांची बैठक अनिर्णित राहिली. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच सुरू केली आहे. प्रशासनानं दिल्लीच्या सीमा सील केल्या असून, राजधानीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
शंभू सीमेवर परिस्थिती बिकट : सीमेवर शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मात्र शंभू सीमेवर परिस्थिती बिकट झाली आहे. पोलिसांनी शंभू सीमेवर अनेक शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. यासोबतच हरियाणाच्या अंबाला येथे शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. शेतकऱ्यांना सुमारे 300 मीटर मागे ढकलण्यात आलं, मात्र आंदोलक अजूनही दिल्लीत प्रवेश करण्यावर ठाम आहेत.
साडेपाच तासांची बैठक अनिर्णित :सोमवारी चंदीगडमध्ये केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि अर्जुन मुंडा यांच्याबरोबर शेतकरी संघटनांची साडेपाच तासांची बैठक अनिर्णित राहिली. आमचा दिल्लीपर्यंतचा मोर्चा कायम राहणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एमएसपीबाबत शेतकरी अजिबात तडजोड करण्यास तयार नाहीत. सरकार आमच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून शेतकरी कूच करतील. 16 फेब्रुवारीला शेतकऱ्यांनी 'भारत बंद'ची हाक दिली आहे.
दिल्लीत कलम 144 लागू : माहितीनुसार, 13 फेब्रुवारीच्या 'दिल्ली चलो मार्च'मध्ये सुमारे 20 हजार शेतकरी 2500 ट्रॅक्टरमधून दिल्लीला पोहोचू शकतात. हरियाणा आणि पंजाबच्या सीमावर्ती भागात अनेक आंदोलक उपस्थित आहेत. ते दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, आंदोलकांनी कोणत्याही परिस्थितीत दिल्लीत प्रवेश करू नये, अशा कडक सूचना दिल्ली पोलीस आणि हरियाणा पोलिसांना देण्यात आल्या आहेत. संपूर्ण दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं असून, 12 फेब्रुवारी ते 12 मार्च या कालावधीत राजधानीत कलम 144 लागू राहील.