शिवकाशी (तामिळनाडू) Explosion In Firecracker Factory : तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील रामू देवनपट्टी येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात 5 महिलांसह 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 गंभीर जखमींवर शिवकाशी सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाचे जवान आणि बचाव कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्यात गुंतले आहेत.
मृतांची संख्या 9 वर पोहोचली :आज सकाळी कामगार कारखान्यात नेहमीप्रमाणे काम करत असताना फटाक्यांच्या रसायनांचा अचानक स्फोट झाला. आधी या स्फोटात 5 महिला कामगार आणि 3 पुरुष कामगारांसह 8 जणांचा मृत्यू झाला. शिवकाशी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे.
अनेक कारखाने बेकायदेशीर : तामिळनाडूमध्ये फटाक्यांचा मोठा उद्योग आहे. सरकारी परवाना नसलेले अनेक बेकायदा कारखानेही येथे सुरू आहेत. अशा कारखान्यांमध्ये कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यानं कामगार प्रत्येक क्षणी जीव धोक्यात घालून काम करतात. गेल्या वर्षीही ऑक्टोबर महिन्यात विरुधुनगर जिल्ह्यातील दोन फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती. रंगपलायम आणि किचिन्यनकापट्टी येथील दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये झालेल्या स्फोटात 11 जण ठार तर 15 हून अधिक जखमी झाले होते.
अनेक ठिकाणी कारवाई : काही काळापूर्वी मध्य प्रदेशातील हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात अनेकांना जीव गमवावा लागला होता. यानंतरही राज्यभरात असे कारखाने चालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. याठिकाणी अनेक बेकायदेशीर फटाके कारखान्यांवर कारवाई करणयात आली आहे. तसंच, येथील अवैध फटाके वाहतूक करणाऱ्या अनेक ट्रक जप्तही करण्यात आल्या आहेत.