नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा अधिवेशनात आज मोठा गदारोळ झाला. आज सादर करण्यात आलेल्या कॅग अहवालानं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. मात्र त्या अगोदर दिल्ली विधानसभेतील महापुरुषांचे तैलचित्र काढल्यानं आपच्या आमदारांनी मोठा गदारोळ केला. त्यामुळे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं. दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी आणि गोपाल राय यांचाही या निलंबित आमदारांमध्ये समावेश आहे.
आपच्या 12 आमदारांचं निलंबन :आज विधानसभा अधिवेशन 2025 मध्ये नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी आपलं भाषण सुरू करताच 'आप' आमदारांनी प्रचंड घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. नायब राज्यपालांच्या भाषणापूर्वी आप आमदारांनी 'जय भीम' च्या घोषणाही दिल्या. मात्र त्यानंतर आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी समज दिल्यानंतर त्यांनी गोंधळ सुरूच ठेवला. त्यामुळे अध्यक्षांनी आम आदमी पार्टीच्या विरोधी पक्षनेत्या आतिशी, गोपाल राय यांच्यासह 12 आमदारांना सभागृहातून निलंबित केलं.