नवी दिल्ली AAP Protest At PM House : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात आम आदमी पक्षानं दिल्लीत जोरदार निदर्शनं केली. यावेळी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोंदींविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ज्यामध्ये पंजाबचे मंत्री तसंच लोकसभा उमेदवार सोमनाथ भारती यांचाही समावेश आहे. केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपाही रस्त्यावर उतरला आहे. दरम्यान, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या मारा केला. पोलीस, निमलष्करी दले दिल्लीत तैनात करण्यात आली आहेत. केजरीवाल यांनी तुरुंगातून दिलेल्या आदेशावर ईडीनं प्रश्न उपस्थित केलेत.
आपचं आज पंतप्रधान निवासस्थानी आंदोलन :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केल्यानंतर आम आदमी पक्षानं मोठा गदारोळ सुरू केला आहे. आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान निवासस्थानाला घेराव घालून आंदोलन करण्याचं ठरवलं. 31 मार्चला रामलीला मैदानावर महारॅलीचं आयोजन करण्यात आलं. त्या महारॅलीत इंडिया आघाडीचे सगळे नेते सहभागी होतील, असं आम आदमी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलय.