नवी दिल्ली :राजधानी दिल्लीतील चार शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी ईमेल करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे. या धमक्यांमुळे पालकांनी आपल्या चिमुकल्यांना शाळेत पाठवण्याबाबत मोठी चिंता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे या अगोदरही दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटानं उडवून देण्याची धमकी देण्यात आली.
बॉम्बस्फोटाची धमकी दिल्यानं पोलीस घटनास्थळी :अज्ञात माथेफिरुनं ईमेल करुन ही धमकी दिल्यानं प्रशासनानं तत्काळ याबाबत पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत तपासणी सुरू केली असून घटनास्थळावर काहीही संशयास्पद आढळलं नाही. त्यामुळे या अगोदरसारखाच हा सुद्धा फेक कॉल असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र पोलीस खबरदारीचा उपाय घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.