लखनौ Holi 2024 : होळीच्या दिवशी प्रत्येक घरात अनेक पदार्थ तयार केले जातात, परंतु 'गूजिया' हा सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. 'गूजिया' बाजारात वेगवेगळ्या रंगात मिळतात. यामध्ये विविध किमतीतील 'गूजियांचे' खास प्रकार सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. यापैकी एक म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा लेप असलेला 'बेबी गूजिया'. लखनऊच्या कँट भागातील प्रसिद्ध मिठाईच्या दुकानात ही तयार करण्यात आलीय. ही मिठाई विकत घेणं प्रत्येकाच्या आवाक्यात नाही.
एका किलोमध्ये 40 नग, किंमत ऐकून व्हाल थक्क : दुकानदार विनोद कुमार गुप्ता यांनी सांगितलं की, यावेळी त्यांनी 24 कॅरेट सोन्याचं कोटिंग घालून 'बेबी गूजिया' बनवलीय. लोकांना ती खूप आवडत आहे. एक्सोटिकामध्ये 6 देशांतील सुका मेवा वापरला जातो. त्यावर 24 कॅरेट सोन्याचं लेप लावलंय. हे 2, 4 आणि 8 तुकड्यांच्या बॉक्समध्ये पॅक केलेलं आहे. 4 नगांच्या बॉक्सची किंमत 4480 रुपये आहे. एक किलोमध्ये 'गूजियाचे' सुमारे 40 तुकडे असतात. एक किलोच्या बॉक्सची किंमत 56 हजार रुपये आहे. या 'गूजियाची' होळीला सुमारे 20 किलो विक्री होत असल्याचं सांगितलं. त्याची विक्री ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन जास्त आहे. देशाच्या इतर भागातील लोक आमच्याकडून 'गूजिया' ऑनलाइन ऑर्डर करतात.