महाराष्ट्र

maharashtra

मानवी तस्करी प्रकरणात मोठे यश, टोळीची मुख्य सूत्रधार 'सपना शूटर' गजाआड

By

Published : Jan 19, 2020, 7:53 PM IST

मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी युनिता टाक उर्फ सपना शूटर हिला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. तिला हिमाचल प्रदेशातील नाहन येथून अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मानवी तस्करी प्रकरणात मोठे यश
मानवी तस्करी प्रकरणात मोठे यश

चंद्रपूर -मानवी तस्करी प्रकरणातील मुख्य आरोपी युनिता टाक (वय ५२) उर्फ सपना शूटर हिला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिला हिमाचल प्रदेशातील नाहन येथून अटक करण्यात आली आहे. न्यायालयापुढे हजर केले असता तिला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील चौकशीत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची दाट शक्यता असून रामनगर पोलीस हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातील आणखी १० ते १५ आरोपींच्या शोधात आहेत.

चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरातील काली माता मंदिरातून ४ जून २०१०ला १० वर्षीय मुलीची प्रसादातून गुंगीचे औषध देऊन थेट हरियाणात विक्री करण्यात आली. जान्हवी मुजूमदार नामक महिलेने या मुलीला बेशुद्धवस्थेत रेल्वेने हरियाणात नेले होते. जान्हवीने तिला हरियाणातील नारायणगढ येथील सपना शूटरच्या ताब्यात दिले. गेल्या १० वर्षांत सपनाने या मुलीचे ७ लग्न लावून दिले. अनेकांशी तिच्या शरीराचा सौदा केला. या मुलीला अल्पवयातच २ मुलं झाली. दीड महिन्यांपूर्वी अशाच एका सौद्याची बोलणी सुरू असताना हरिणायातील यमुनानगर येथील 'आय एम ए ब्लड डोनर' या स्वयंसेवी संस्थेने पीडितेची सुटका केली. तिने हरियाणा पोलिसांना १० वर्षांपूर्वी चंद्रपुरातून तिला पळवून आणल्याचे सांगितले. चंद्रपूर पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरून जान्हवी मुजूमदार, गीता मुजूमदार अणि सावित्री रॉय या चंद्रपुरातील आरोपींना अटक केली आहे.

या प्रकरणाच्या तपासात सपना शुटर मानवी तस्करीतील महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले होते. रामनगर पोलिसांचे पथक ८ दिवसांपूर्वी हरियाणाला रवाना झाले मात्र, हरियाणातील यमुनानगरमधून आधीच सपनाने पळ काढला होता. त्यानंतर ती चंदीगडला असल्याची माहिती मिळाली. पोलिस तिथेही धडकले. परंतु, सपना तिथूनही पसार झाली. हा लपंडाव ४ दिवस सुरू होता. शेवटी ती हिमाचल प्रदेशातील नाहन येथील तिच्याच घरी चंद्रपूर पोलिसांच्या हाती लागली. तिला ८ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून याप्रकरणातील आणखी १० ते १५ आरोपींच्या शोधात पोलीस आहेत.

हेही वाचा - चंद्रपुरात मानवी तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; वीसहून अधिक मुली विकल्याची आरोपींची कबूली

सपनाला सुरक्षेच्या कारणामुळे दिल्लीतून विमानाने नागपूरपर्यंत आणले. युनिता टाक हे तिचे खरे नाव आहे. तिच्यावर हरिणाया आणि हिमाचल प्रदेशातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आत्तापर्यंत चंद्रपुरातून अटक करण्यात आलेल्या ३ महिलांनी वीसच्यावर मुली विकल्याची कबुली दिली आहे. सपनाच्या अटकेने या मुली पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा - सहकारी मित्रांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याची आत्महत्या

ABOUT THE AUTHOR

...view details