लखनौ :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा लखनौ सुपर जायंटचा मार्गदर्शक गौतम गंभीरवर मैदानातच चालून गेला. यावेळी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत विराट कोहलीला बाजुला केले. विराट कोहलीच्या या कृत्यामुळे त्याला 100 टक्के फी कपातीचा दंड ठोठावण्यात आला. दुसरीकडे याच सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान एक तरुण मैदानात घुसून विराटच्या पायाला स्पर्श करू लागला. त्यानंतर कोहलीने त्याला मिठी मारली. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानात विराट कोहलीची एकाचवेळी वेगवेगळी रुपे पाहायला मिळाली.
विराट कोहली आणि गौतम गंभीरचा जुना वाद :विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंमधील वादाच्या कहाण्या जुन्या आहेत. याआधी गौतम गंभीरने आयपीएल सामन्यात विराट कोहलीच्या वादाचा सामना केला आहे. तर, बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात लखनौने विजय मिळवला, तेव्हाही कोहलीची कृती आक्रमक मानली जात होती. लखनौच्या सामन्यात विराट कोहली चांगलाच आक्रमक झाला. यावेळी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत विराटला मैदानात नेले.
बंगळुरूने घेतला बदला :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जॉयंट या दोन संघातील सामना लखनौतील अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानात पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने 3 झेल घेत 31 धावा केल्या. हा सामना जिंकून बंगळुरूने लखनौकडून पहिल्या पराभवाचा बदला घेतला. सामना संपल्यानंतर तो पॅव्हेलियनकडे जात असताना लखनऊचा मेंटर गौतम गंभीरसोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी त्यांना वेगळे केले.