मुंबई- ‘टकाटक’ च्या पहिल्या भागाप्रमाणे दुस-या भागातील कथानकही अर्थातच तरूणाईवर आधारित आहे. असं असलं तरीही तरूणाईपासून थोरांपर्यंत सर्वचजण ‘टकाटक २’च्या कथानकाशी एकरूप होतील. मराठी बॅाक्स ऑफिसवर तूफान गर्दी खेचणाऱ्या 'टकाटक' या मराठी चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या 'टकाटक २'ची रसिक खूप आतुरतेनं वाट पहात आहेत. नुकतेच 'टकाटक २'चं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांसोबत शेअर करण्यात आलेल्या 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरमध्ये सर्वच कलाकारांची धमाल पहायला मिळत आहे. 'टकाटक'च्या यशानंतर 'टकाटक २' जणू इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
लेखक-दिग्दर्शक मिलिंद कवडे यांच्या 'टकाटक २'च्या मोशन पोस्टरनं अल्पावधीतच लक्षवेधी लाईक्स मिळवले आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची पसंती मिळवत बाजी मारल्याचंही चित्र पहायला मिळत आहे. 'टकाटक २'च्या माध्यमातून रसिकांना पुन्हा एकदा एक फ्रेश कथानक अनुभवायला मिळणार आहे.मिलिंद कवडे यांनी नेहमीच आपल्या कलाकृतींद्वारे मनोरंजक कथानकाच्या माध्यमातून एक सामाजिक संदेश समाजापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपटही त्याला अपवाद नाही. ऍडल्ट कॅामेडी असूनही प्रेक्षकांनी जसा 'टकाटक'मधील सामाजिक संदेश समजून घेऊन चित्रपट डोक्यावर घेतला तसाच 'टकाटक २' देखील घेतील असा विश्वास कवडे यांनी व्यक्त केला आहे.