नागपूर Kunal Raut Health : जिल्हा परिषदेत लावलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाला काळा रंग फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना पोलिसांनी रविवारी (4 फेब्रुवारी) अटक केली होती. त्यानंतर कुणाल राऊत यांची सोमवारी पोलीस कोठडीत तब्येत बिघडली. राऊत यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात (इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल) उपचाराकरिता दाखल करण्यात आलंय.
कुणाल राऊत यांची तब्येत खालावली : नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फलकाचं विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. सोमवारी जिल्हा सत्र न्यायालयानं कुणाल राऊत यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राऊत यांची कोठडीत अचानक तब्येत खालावली असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
काँग्रेस बॅकफूटवर : नागपूर जिल्हा परिषद येथे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेल्या योजनांचे फलक लागले होते. काही लोकांनी त्या फलकावरील मोदींच्या फोटोला काळं फासलं अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर आम्ही प्रशासनाला फोन करून याची चौकशी करून उचित कारवाई करावी अशी मागणी केली होती. असं कृत्य करणाऱ्या लोकांचं नागपूर जिल्हा परिषदेचे कोणतेही पदाधिकारी तसंच महाविकास आघाडीचे पदाधिकारी समर्थन करणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी दिली.
दोन दिवस पोलीस कोठडी : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना अटक करण्यात आलीय. कुणाल राऊत हे माजी मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळं फासलं असल्यानं त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ते दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, पोलीस त्यांची कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे.
भाजपाकडून आंदोलन : या कृत्याविरोधात भाजपा आक्रमक झालं असून, भाजपाच्या आमदारांच्या नेतृत्वाखाली सोमवारी नागपूर जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आलं होतं. नागपूर शहर भाजपा व ग्रामीण भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं.
हेही वाचा -