शिर्डी (अहमदनगर) White Jamun Farming : जांभळ्या रंगाचे जांभूळ आपण पाहतो आणि खातो. आता शिर्डीतील एका तरुण शेतकऱ्यानं चक्क पांढऱ्या रंगाच्या जांभळाची बाग फुलवली असून यातुन तो लाखोंचं उत्पन्न घेतोय. अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी येथील संकेत काळे या तरुणानं आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडुन चार वर्षांपुर्वी आपली वडिलोपार्जित शेती करण्याचा निर्णय घेतला. थायलंड देशात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या जांभूळ फळाची रोपे आणत त्याची लागवड आपल्या शेतात केली. आज 4 वर्षानंतर या झाडांना मोठ्या प्रमाणात जांभूळ लागली असुन यातुन संकेत काळे यातून लाखो रुपयांचं उत्पन्न घेतोय.
कशी केली लागवड : चार वर्षांपूर्वी संकेतनं शेतीतील एक एकर क्षेत्रात 12 बाय 12 फुटावर (थायलंड व्हाईट जांभूळ) या जातीच्या पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या 250 झाडांची लागवड केली. जांभळाची झाडं मोठे होण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी जाणार होता. त्यामुळं वर्षाकाठी या झाडांना शेणखत आणि औषधाला चाळीस हजार रुपय खर्च येणार असल्यानं संकेतनं यात विविध अंतर पिकं घेतली. या पिकातून मिळलेल्या उत्पन्नातून जांभूळ रोप घेण्यासाठी आलेला खर्च आणि झाडांना लागणारी औषधं खतासाठी केलेला खर्च निघाल्याचं संकेतनं सांगितलं.
यंदाच्या वर्षी उत्पन्नात वाढ : 2020 साली लागवड केलेल्या झाडांना मागील वर्षापासून फळ येण्यास सुरुवात झाली. पाहिलं वर्ष असल्यानं एका झाडाला साधारणतः 7 ते 8 किलो फळ निघाले होते. त्यावेळी सगळा खर्च वजा करत एका झाडा मागं 1 हजार रुपये नफा मिळाला होता. साधारणतः मागील वर्षी अडीच लाख रुपये निव्वळ नफा मिळाला होता. यंदाचं हे दुसर वर्ष असुन एका झाडाला साधारणतः 15 ते 18 किलो फळं निघत असुन बाजारातही यांना 200 ते 250 रुपये प्रति किलो भाव मिळत आहे. पांढऱ्या रंगाचं जांभूळ असतं हे अजूनही काही लोकांना माहित नाही. मागील वर्षी आम्ही बऱ्या पैकी मार्केटिंग केली होती. त्यामुळं यावर्षी जास्त मार्केटिंग करण्याची गरज पडली नाही. यावर्षी मुंबई, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणी आमचा माल गेला. मागील वर्षापेक्षा यावर्षी भावही जास्त मिळत असून, यावर्षी झाडांना फळंही जास्त लागत असल्यानं यावेळी सगळा खर्च वजा करता साधारणतः पाच ते सहा लाख रुपये निव्वळ नफा मिळणार असल्याचं शेतकरी संकते काळेंनी सांगितलं.
असं आहे झाडाचं वैशिष्ट्य : पांढऱ्या रंगाच्या जांभळाच्या झाडांची उंची कमी असते आणि या झाडांना मुळा पासूनच फळ येण्यास सुरुवात होते. जसी जसी झाडाची उंची वाढते तसे तसे झाडांना फळं येण्याची संख्या वाढते. एका झाडाचं आयुष्य साधारणतः 25 वर्ष इतकं असतं. ऊन, वारा, पाऊस, गारपीट याचा कुठलाही फटका या झाडांना बसत नाही. सर्वात कमी खर्चात जास्त कष्ट न घेता सर्वात जास्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या या जांभूळ लागवडीकडं शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे असा सल्लाही संकेतनं दिला. कमी खर्चात चांगलं उत्पन्न मिळवण्याचा चांगला पर्याय आहे. रोपे उपलब्ध करणे, लागवड तंत्रज्ञान माहिती देणे, विक्री व बाजारपेठ याबाबत आपण इच्छुक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करु असंही या तरुण शेतकऱ्यानं म्हटलंय.
पांढऱ्या जांभळाला मागणी : जांभळ्या जांभूळ प्रमाणे पांढरी जांभळही आयुर्वेदिक समजली जातात. पांढरी जांभूळ डायबिटीस, किडनी विकार असलेल्या रुग्णांसाठी लाभदायक आहेत. पांढरे जांभूळ खाण्यास चविष्ट आहे. त्यामुळं आता बाजारात जांभळ्या जांभूळ पेक्षा पांढऱ्या रंगाचा जांभळाला मागणीही वाढत असल्याचं संकेतनं सांगितलं.
हेही वाचा :