मुंबई Gopal Krishna Gokhale Bridge : अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या बांधकामादरम्यान रेल्वे प्रशासनाच्या धोरणानुसार त्याची उंची वाढवण्यात आली. तसंच पुलाचे अप्रोच रस्तेही उंच करण्यात आले होते. त्यामुळं बर्फीवाला पुलाच्या दिशेने प्रचंड उतार झाला होता. वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी एवढ्या मोठ्या उतारावर पुलाला जोडणं अशक्य आहे. त्यामुळं यावर उपाययोजना करण्यासाठी वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूटची (व्हीजेटीआय) मदत घेण्यात येत असून, लवकरच त्यांच्याकडून सूचना अपेक्षित आहेत. या सूचना प्राप्त होताच गोखले पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये बर्फीवाला पुलाची कामे हाती घेण्यात येतील, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, पूल खुला केल्यानंतर पालिका सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. अंधेरी पश्चिम येथील गोखले ब्रिजबरोबर बर्फीवाला ब्रिज अलाइन करण्यात आलेला नाही. गोखले पुलाची उंची बर्फीवाला पुलापेक्षा दीड मीटरने जास्त आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पालिकेचा अभियंता विभाग विनोदाचा भाग झाला आहे.
पुलांना जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार : या संदर्भात पालिकेनं दिलेली माहिती अशी की, बर्फीवाला पूल गोखले पुलाशी जोडण्यासाठी महापालिका, रेल्वे प्राधिकरण, सल्लागार यांच्या नियमित बैठका घेऊन अनेक पर्यायांवर विचार करत आहे. गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन 26 फेब्रुवारीला झालं होतं. त्यामुळं पूर्वी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्याच्या कामासह दोन्ही पुलांना जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. पालिकेच्या म्हणण्यानुसार, व्हीजेटीआय संस्थेच्या सल्लागारांनी पुलाच्या जागेला भेट दिली असून ते दोन्ही पूल जोडण्यासाठी पर्याय सुचवतील अशी अपेक्षा आहे. हे पर्याय महापालिकेला सुचल्यानंतर दोन्ही पुलांना जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यासोबतच दुसऱ्या टप्प्याचे कामही जलदगतीनं करण्यात येणार आहे.
मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता : बर्फीवाला पूल तसंच गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या संबंधात झालेल्या गोंधळानंतर पालिकेच्या कामावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यासाठी पालिकेनं आता कारणे दिली आहेत. बर्फीवाला उड्डाणपुलाला गोपाळ कृष्ण गोखले पुलाशी जोडण्यासाठी अतिरिक्त जागेची गरज असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. गोखले पुलाच्या कामासोबत जोडणीचं काम हाती घेतल्यास हे दोन्ही मार्ग बंद करावे लागतील. त्यामुळं स्वामी विवेकानंद मार्ग आणि बर्फीवाला मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्याच्या कामासह दोन्ही पुलांना जोडण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. व्हीजेटीआय संस्थेनं सुचविलेल्या प्रक्रियेनंतर या दोन्ही पुलांना जोडण्याचं काम पालिका प्रशासनाकडून लवकरच केलं जाणार आहे.
रेल्वे पुलाची पुनर्बांधणी करण गरजेचं : महापालिका क्षेत्रातील गोखले पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 20 एप्रिल 2020 रोजी आदेश जारी करण्यात आले होते. त्यामुळं पुलाच्या पुनर्बांधणीचं काम 15 मार्च 2021 रोजी सुरू झालं. पूर्वेला जुना पूल हटविण्याचं काम सुरू असतानाच, रेल्वे प्रशासनानं 24 मार्च 2021 रोजी पत्राद्वारे कळवलं की, रेल्वे पुलाची पुनर्बांधणी करण गरजेचे आहे. या पुनर्बांधणीच्या कामात पालिकेनं रेल्वे पुलाखाली किमान 6 मीटर ओव्हरहेडची उंची राखली पाहिजे. त्यानुसार रेल्वे ओव्हर ब्रिज, ओपन वेब गर्डरच्या डिझाइनचं काम पूर्ण करून महापालिकेच्या वतीनं रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आलं.
हे वाचलंत का :