मंत्रालयात नोकरीच्या आमिषानं गंडवलं; लिपिक पदाचं बनावट नियुक्तीपत्र दिलं, जोडपं अटकेत - FRAUD IN MANTRALAY JOB
मंत्रालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक करणाऱ्या एका दांपत्यास पोलीसांनी अटक केलीय. या प्रकरणातील तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
Published : Oct 9, 2024, 6:08 PM IST
ठाणे : मंत्रालयात लिपिक पदासाठी नोकरीचे आमिष दाखवून 4 लाख 20 रुपयांची फसवणूक करणाऱ्या कासारे दांपत्यास भाईंदर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर यामधील मुख्य आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफ्फुल वाघ यांनी दिली.
नोकरीचं अमिष दाखवून फसवणूक : सध्या सरकारी नोकरी, म्हाडामध्ये घर देतो, असे फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत.अशीच एक घटना भाईंदर पश्चिमेला राहणाऱ्या निकी भोईर यांना नोकरीचं अमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करून कासारे दांपत्यास अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय? : आरोपी प्रीती कासारे ही बोरिवली येथे इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करते. येथं प्रीतीची एका व्यक्तीशी ओळख झाली. प्रीतीनं त्यांना सांगितलं की, मंत्रालयात लिपिक पदाची नोकरी कोणाला हवी असल्यास मला संपर्क करा, मी त्याचं काम करून देईन. तुम्हाला देखील त्यातून थोडी आर्थिक मदत होईल. अशाप्रकारे कासारे दांपत्यानं आणि फरार असलेल्या आरोपीनं निकी भोईर यांना नोकरीचं आमिष दाखवून 4 लाख 20 हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर या दांपत्याकडून आणि फरार आरोपीकडून निकी भोईर यांना उडवा उडवीची उत्तर मिळत होती. निकी भोईर यांना बोगस लिपिक पदावर आपली नियुक्ती झाल्याचं पत्र देखील देण्यात आलं. मात्र, ते बोगस असल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर तक्रारदार निकी भोईर यांना संशय आल्यानं त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपीनं केलीय अनेकांची फसवणूक : भाईंदर पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून कासारे दांपत्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. फरार आरोपीनं अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. सरकारी नोकरी देतो, म्हाडामध्ये घर देतो अशा प्रकारचे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळं नागरिकांनी पडताळणी करूनच पैसे द्यावे. अनोळखी व्यक्तींशी असे व्यवहार करू नका, असं आवाहन भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी केलं.
हेही वाचा