मुंबई Raksha Bandhan 2024 : बहीण भावाचं प्रेमळ नातं ज्या धाग्यानं बांधलं जाते तो सण म्हणजे रक्षाबंधन. आज संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह आहे. अशात संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे ते एका बहीण भावाच्या जोडीकडं. हे बहीण भाऊ महाराष्ट्राच्या राजकारणात दादा आणि ताई म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी दादा मुंबईत आणि ताई नाशिकमध्ये असल्यानं राजकारणातील हे प्रसिद्ध बहीण भाऊ आज राखी बांधणार का? याकडं सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. हे बहीण भाऊ म्हणजे अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आहेत.
सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का? : चाळीस आमदारांसह उपमुख्यमंत्री अजित पवार वेगळे झाले आणि त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगितला. निवडणूक आयोगानं देखील राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना दिलं. त्यानंतर राजकारणात एकत्र कुटुंब म्हणून ज्या घराण्याचं उदाहरण दिलं जायचं, अशा पवार घराण्यात फूट पडली. 'राम कृष्ण हरी वाजवा तुतारी' म्हणत सुप्रिया सुळे या अजित पवारांविरोधात मैदानात उतरल्या. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवली. त्यामुळे एकूणच पवार कुटुंबात असलेले सध्याचे मतभेद आणि मनभेद पाहता नेहमीच सर्व सण उत्सवांना एकत्र येणारं पवार कुटुंब यावर्षी राजकीय मतभेद बाजुला सारुन पुन्हा एकदा एकत्र येणार का? आणि सुप्रिया सुळे या अजित पवार यांना राखी बांधणार का ? याची उत्सुकता नागरिकांना लागली आहे.
सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर भगरेंना बांधली राखी : पवार घराण्यात हे वाद सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी "बारामतीतल्या सर्व भावंडांनी सुप्रिया सुळेंना एक मोठी बहीण म्हणून लोकसभेत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या सर्व भावंडांच्या पाठिंब्याची जाण सुप्रिया सुळे यांनी ठेवावी" असं आवाहन संजय राऊत यांनी केलं. यावर सुप्रिया सुळे यांनी 'रामकृष्ण हरी' म्हणत आपली प्रतिक्रिया दिली. अशातच रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी नाशिक दौरादरम्यान सुप्रिया सुळे यांनी खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून औक्षण केल्यानं चर्चा सुरू झाल्या आहेत.
अजित पवार मुंबईत तर सुप्रिया सुळे नाशकात : भास्कर भगरे हे दिंडोरी लोकसभेचे खासदार असून 3 महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला. भास्कर भगरेंना सुप्रिया सुळे यांनी राखी बांधल्यानं सध्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच सध्या अजित पवार मुंबईत असून त्यांचे मुंबईत विविध कार्यक्रम आहेत. तर, दुसरीकडं सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर असून त्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे आज दिवसभरात हे बहीण भाऊ राखी बांधतात का? याची उत्सुकता बारामतींसह राज्यातील नागरिकांना लागली आहे.
हेही वाचा :
- खासदार सुप्रिया सुळेंनी 'खासदार' भावाला बांधली राखी; अजित पवार म्हणाले, "हा दादा कायम..." - Raksha Bandhan 2024
- भावाला बांधा आणि खा चॉकलेटची राखी, विविध पद्धतीच्या राख्या बाजारात दाखल; पाहा व्हिडिओ - Chocolate Rakhi
- पद्मश्री राहीबाईंनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी बनवली खास ‘बीज राखी’ - Raksha Bandhan Special Rakhi