मुंबई- माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे मूळचे बिहारमधील रहिवासी होते. त्यांचा जन्म 13 सप्टेंबर 1958 रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव बाबा झियाउद्दीन सिद्दीकी होते. मुंबईतील वांद्रे येथे वडिलांसोबत ते घड्याळ दुरुस्त करायचे काम करायचे. राजकारणातील यशानंतर ते 1977 मध्ये मुंबई युवक काँग्रेसचे सरचिटणीस बनले. त्यानंतर चित्रपट अभिनेते आणि काँग्रेस नेते सुनील दत्त यांच्या संपर्कात आले. त्यानंतर त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कारकीर्दीत यशाचे अनेक टप्पे आले.
- बिहारमधील नेत्यांशी जवळचे संबंध- बिहारमध्ये 2018 ला पूर आल्यानंतर त्यांनी मुंबईहून अररिया आणि बिहारच्या इतर जिल्ह्यांमध्ये मदतीकरिता साहित्य पाठविले होते. बाबा सिद्दीकी यांचे बिहारच्या सर्व नेत्यांशी चांगले संबंध होते. यामध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय मंत्री जीतन राम मांझी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अखिलेश प्रसाद सिंग, काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर आणि डाव्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश आहे.
बॉलीवुडमध्ये लोकप्रिय- बाबा सिद्दिकी यांनी विधानसभेत वांद्रे (पश्चिम) या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केले होते. मुंबईतील अल्पसंख्याक समुदायातील वजनदार नेता, अशी त्यांची प्रतिमा होती. अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेता संजय दत्त यांच्यासह अनेक बॉलिवूड स्टार यांच्याशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध होते. बाबा सिद्दीकी हे भव्य इफ्तार पार्ट्यांसाठी ओळखले जात होते. या पार्टीमध्ये अभिनेता सलमान खान, अभिनेता शाहरुख खानसारखे प्रसिद्ध सेलिब्रिटी हजर राहत होते. राष्ट्रवादीचे नेते ( अजित पवार गट ) बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राजकारण आणि बॉलीवुडमधून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे.
काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार पक्षात केला प्रवेश- बाबा सिद्दीकी यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. "काही गोष्टी न सांगणे चांगले" असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी काँग्रेसवर थेट टीका केली नव्हती. त्यांनी म्हटलं होतं, “माझा राजकीय प्रवास इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि संजय गांधींसोबत राहिला होता. काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे माझ्या वडिलांसारखे आहेत. पण कधी-कधी वैयक्तिक आयुष्यात काही निर्णय घ्यावे लागतात." काँग्रेसमधील 48 वर्षांच्या प्रवासात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे त्यांनी आभार मानले होते.
मुंबईतील राजकीय वर्तुळात होता प्रभाव- बाबा सिद्दीकी हे 1999, 2004 आणि 2009 मध्ये सलग तीन वेळा आमदार होते. त्यांनी राज्य सरकारमध्ये (2004-08) अन्न व नागरी पुरवठा, कामगार आणि FDA राज्यमंत्री होते. ते सलग दोन वेळा नगरसेवकही होते. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संसदीय मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईत विशेषत: मुस्लिमबहुल प्रभागांमध्ये त्यांची विशेष पकड होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केल्यानं पक्षाची मुंबईत मजबूत स्थिती झाली होती. त्यांचा मुलगा झीशान सिद्दिकी सध्या मुंबईतून काँग्रेसचा आमदार आहे.
हेही वाचा-