मुंबई Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महायुतीवर वरचढ ठरल्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी मोठा धक्का देण्याच्या तयारीला लागली आहे. महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुकीला सामारे जाण्याचे संकेत महाविकास आघाडीकडून दिले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा कोण असेल? यावरून विरोधक महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न करीत करीत आहेत. त्यातच संजय राऊत यांनी महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, असं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे.
महाविकास आघाडी विरोध म्हणून कुचकामी? : आगामी विधानसभा निवडणूक विषयी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील वेळोवेळी भाषण केलेलं आहे की, आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. विधानसभा निवडणुकीत नेतृत्व कोण करणार यावर महायुतीत विसंवाद नाही. मात्र अशा प्रकारचे एकमत किंवा एकवाक्यता महाविकास आघाडीत नाही. त्यामुळं ते ठामपणे जाहीर करू शकत नसल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते संजू भोर पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला काहीअंशी यश मिळालं असलं तरी विधानसभेत मात्र विरोधी पक्ष नेते म्हणून ते कुचकामी ठरले आहेत. तसंच त्यांच्याकडे विकासाचं कुठलंही व्हिजन नाही, या सर्व गोष्टी महाविकास आघाडीला घरी बसवायला पुऱ्या ठरतील, असा विश्वास भोर पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महाविकास आघाडी म्हणून निवडणूकीला सामोरे जाणार : आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच समोरे जाणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसंच राज्यात वाढलेली महागाई, भ्रष्टाचार आणि जातीनिहाय जनगणना करण्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचं ते म्हणालेत. ओबीसी आणि मराठा समाजात वाद लावण्याचं काम भाजपानं केलं आहे, असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेस पक्षाचा सामूहिक नेतृत्वावर विश्वास : महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार यावर बोलताना काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाणार असल्याचा निर्णय झालेला आहे. तसंच काँग्रेस पक्ष सामूहिक नेतृत्वावर विश्वास ठेवत असतो आणि सामूहिकरित्या पुढे जात असतो. आम्ही कशासाठी लढत आहे हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आम्ही लढतोय देशाची लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी. तसंच लादलेली महागाई, बेरोजगारीचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रात प्रामुख्यान शेतकऱ्यांचा प्रश्न राज्यात शेतकरी आत्महत्या करत होता तर सरकारमधील मंत्री थंड हवेच्या ठिकाणी परदेश दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत सरकार उदासीन आहे. राज्यातील उद्योगधंदे बाहेर गेलेले आहेत. राज्यातील शिंदे फडणवीस पवार सरकार गुजरातच्या हितासाठी काम करत असल्याचा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे. महाराष्ट्रातील या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आम्ही लढू आणि हेच आमच्यासाठी महत्त्वाचे प्रश्न असतील असंही त्यांनी म्हटलं आहे.''
मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल : महायुतीकडून वारंवार महाविकास आघाडीला तुमचं विधानसभा निवडणूक नेतृत्व कोण करणार असं हिणवलं जात आहे. त्यातच महाविकास आघाडीत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर आघाडीचे खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सर्वाधिक जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असं कोण म्हणतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत राज्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल. मुख्यमंत्री पदाचा चेहरा नसेल तर बिन चेहऱ्याची निवडणूक लढता येणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं. महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या नेतृत्वाचा परिणाम असल्याचा दावा त्यांनी केला आहे. संजय राऊत यांच्याकडून महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा संकेत दिला जात आहे. महाविकास आघाडी एकत्र असली तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यावाच लागेल, असं ते म्हणाले आहेत.
महाविकास आघाडी बैठकीत निर्णय : संजय राऊत यांच्या महाविकास आघाडीचनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायला हवा, यावर बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, या संदर्भात कोणी काही बोलो, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. मात्र महाविकास आघाडीतील पक्षांची बैठक होणं बाकी आहे. अजून जागावाटचा प्रश्न बाकी आहे. महाविकास आघाडीची बैठक होईल त्यावेळी याविषयी चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी अशा प्रकारे भाष्य करून महायुतीला कामाला लावल्याचं बोललं जात आहे. जर महाविकास आघाडीनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला तर महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा
- NEET पेपर लीक प्रकरण : आरोपी जलील पठाणचा उदगीरात एक कोटीचा बंगला; दिव्यांग प्रमाणपत्रही बोगस? - NEET Paper Leak Case
- खासदार कंगना रनौत आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांचं संसदेत 'पुनर्मिलन' !! - Kangana Ranaut and Chirag Paswan
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरण: राहुल गांधींच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण, निकाल ठेवला राखून - RSS Defamation Case