नालासोपारा - मराठी रेल्वे प्रवाशांकडून मराठीची मागणी करणार नसल्याचं धमकावून माफीनामा लिहून घेणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासनीसाला मराठी एकीकरण समितीने चांगलाच दणका दिलाय. रेल्वेच्या नालासोपारा कार्यालयात मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी 3 तास ठिय्या दिल्यानंतर अखेर त्या मुजोर टीसीचं निलंबन करण्यात आलंय. टीसीचं निलंबन करून पुढील कारवाई सुरू असली तरी मराठी एकीकरण समितीनं तिकीट तपासणीस कायमस्वरूपी बडतर्फ होईपर्यंत पाठपुरावा सुरू राहणार असल्याचंही सांगितलंय.
नालासोपारा रेल्वे स्थानकावर पश्चिम रेल्वेवर तिकीट तपासनीस असलेल्या रितेश मौर्याची भाषा एक स्थानिक प्रवाशाला समजली नाही. प्रवाशानं मराठी बोला म्हटल्यावर मौर्याने गुंडगिरी करण्यास सुरुवात केली, तसेच पोलीस बोलावून धमकावून यापुढे मराठीची मागणी करणार नसल्याचं लिहून घेतलं. हा प्रकार मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर ते रेल्वेच्या नालासोपारा कार्यालयात दाखल झाले. मराठी राज्यात दंडेलशाही कशासाठी? असा सवाल मराठी एकीकरण समितीने उपस्थित केलाय.
टीसी असलेल्या रितेश कुमार मौर्य यानं पश्चिम रेल्वेवरून प्रवास करणाऱ्या मराठी प्रवाशाला "तुम इंडियन हो तो हिंदी आनी चाहिये, मराठी की बात करोगे तो एफआयआर कर दूंगा," अशी धमकी दिली. एका परप्रांतीय तिकीट तपासनीसानं मराठी असलेला प्रवासी आणि त्याच्या पत्नीला नालासोपाऱ्यातील RPF पोलीस चौकीत बसवून ठेवले. महिलनं या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचाही प्रयत्न केला, परंतु टीसीनं बळजबरीनं तो व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडले. तसेच मराठी प्रवाशाकडून पुन्हा कधी मराठीची मागणी करणार नसल्याचं RPF पोलिसांकरवी लिहून घेतलं. हा प्रकार समजल्यानंतर मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी तात्काळ रेल्वेच्या नालासोपारा कार्यालयात धाव घेतली.
खरं तर हा संपूर्ण राज्याचा, राज्यभाषेचा आणि मराठी भाषकांचा अपमान झाल्याची माहिती मराठी एकीकरण समितीच्या शिलेदारांनी रेल्वे व्यवस्थापनास दिली. चार तासांच्या कायदेशीर संघर्षानंतर टीसी रितेशकुमार मौर्य याचं निलंबन झालं असून, विभागांतर्गत त्याची चौकशी सुरू आहे. तसेच त्याची वेतनवाढ अन् पदोन्नती थांबवण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून त्याच्यावर फौजदारी गुन्हासुद्धा नोंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या सहकार्याबद्दल मराठी एकीकरण समितीने आभार मानले आहेत.
हेही वाचा :