पुणे Supriya Sule On Government Formation : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे तर 'इंडिया' आघाडीला देखील 240 जागा मिळाल्या आहेत. गुरुवारी इंडिया आघाडीची बैठक दिल्लीत झाली असून या बैठकीत देशात सरकार बनवण्याबाबत हलचाली झाल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की, "एक गोष्ट मान्य केली पाहिजे की जे मॅजिक आकडा पाहिजे तो आमच्याकडं नाही. म्हणून आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत. आम्हाला घाई घाईत कुठलाही निर्णय घ्यायचा नाही."
सुप्रिया सुळेंचं ढोल ताशाच्या गजरात स्वागत : खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामतीमधील विजयानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांचं ढोल-ताशाच्या गजरात गुलाल, फुलांची उधळण करत त्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "मी राज्यासह बारामती लोकसभा मतदार संघातील जनतेचे आभार मानते. आता खऱ्या अर्थानं जबाबदारी ही वाढली आहे. उद्यापासून बारामतीत दुष्काळी दौरा सुरू करण्यात येणार आहे. राज्यात महागाई आणि बेरोजगारीचं संकट आहे. राज्यातील जनतेनं दडपशाहीला नाकारलं. माझ्या स्वागतासाठी जे पैसे खर्च केले जात आहेत, ते दुष्काळग्रस्तांसाठी द्या. त्यांच्यासाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करा," असं यावेळी सुळे म्हणाल्या.
अजित पवारांच्या विकासाच्या मुद्द्याला नाकारलं : बारामती लोकसभा मतदार संघात 48 हजाराचा लीड मिळाला असून लोकांनी अजित पवार यांच्या विकासाच्या मुद्द्याला नाकारलं आहे, असं वाटते का, याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. यावेळी त्या म्हणाल्या की कोणीच काय नाकारत नाही. एखादी निवडणूक लढवत असताना मी कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात निवडणूक लढवत नाही. माझी ही लढाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नव्हती, तर ही लढाई वैचारिक होती. महागाई, बेरोजगारी, दुष्काळ तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर माझी ही लढाई होती, असं यावेळी सुळे म्हणाल्या.
आमदारांच्या घरवापसीवर सुप्रिया सुळेंनी केलं मोठं वक्तव्य : अनेक सहकारी हे सोडून गेले असून ते परत येणार असल्याची चर्चा आहे. यावर सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की "देशात लोकशाही असून प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. एखाद्यानं निर्णय घेतला असेल, तर त्याला आपण शुभेच्छा द्याव्या. पण एक गोष्ट सांगेल की या देशात टॅलेंट की कमी नाही," असं यावेळी सुळे म्हणाल्या.
अजित पावरांनी दिल्यात शुभेच्छा ? : अजित पवार यांनी शुभेच्छा देण्यासाठी फोन केला का, असं यावेळी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी, मला सोशल मीडिया बघायलाच वेळ भेटलेला नाही. माझा फोन देखील माझ्याकडं नसल्यानं मी ते बघितला नाही, असं यावेळी सुळे म्हणाल्या. तसेच अजित दादांना काय सल्ला देणार, याबाबत सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की "मी एक मराठी मुलगी असून आपल्यापेक्षा वयानं, कर्तुत्वानं आणि नात्यानं जे मोठे असतात, त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो. तर त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो," असं देखील यावेळी सुळे म्हणाल्या. अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हाला पिपाणी चिन्हाचा फटका बसला आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या की "जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची देखील जागा गेली नसती. हा रडीचा डाव आखण्यात आला होता," असं यावेळी सुळे म्हणाल्या.
माझ्या वहिनीबद्दल कायम माझ्या मनात आदर : विरोधी उमेदवार सुनेत्रा पवार यांनी शुभेच्छा दिल्या का, असं यावेळी सुप्रिया सुळे यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलं. यावेळी त्या म्हणाल्या की "माझ्या वहिनी या मोठ्या वहिनी आहेत. वयानं तसेच नात्यानं देखील त्या माझ्या पेक्षा मोठ्या आहेत. म्हणून माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेम राहणार आहे. त्यांची मुलं देखील माझ्या मुलांच्या प्रमाणं आहेत," असंही यावेळी सुळे यांनी सांगितलं.
हेही वाचा :
- शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड'ची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाल्या, 'सुळेंमुळं..." - Sonia Duhan On Supriya Sule
- सत्तास्थापन करण्याकरिता इंडिया आघाडी आज ठरविणार रणनीती, शरद पवारांसह सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना - INDIA Bloc meeting today
- सुप्रिया सुळेंच्या समारोप सभेत रोहित पवार भावूक, अजित पवारांनी केली मिमिक्री - Ajit Pawar Mimicry Rohit Pawar