नागपूर VNIT student suicide Nagpur : भारतातील सर्वात प्रतिष्ठित महाविद्यालयांपैकी एक असलेल्या विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (VNIT) शिकत असलेल्या बी.टेकच्या विद्यार्थ्यांनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दिव्यांशु गौतम असं आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. तो बिहारच्या पूर्णिया येथील रहिवासी आहे. घटनेची माहिती समजताचं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय. पोलिसांनी घटनास्थळावरून एक सुसाईड नोट जप्त केली असून त्या आधारे तपास सुरू आहे. दिव्यांशुनं दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. आज दुपारी दिव्यांशुच्या खोलीमधून दुर्गंधी येत होती. त्यानंतर खोलीचं दार तोडण्यात आलं, तेव्हा दिव्यांशु मृतावस्थेत पडला होता.
सुसाईड नोट पोलिसांनी केली जप्त : दिव्यांशु गौतम (22) या विद्यार्थ्यांनं आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्यात दिव्यांशुनंं त्याच्या आत्महत्येसाठी कुणाल जबाबदार धरण्यात येऊ नये, असं नमूद केलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दिव्यांशु गौतमला काही विषयांमध्ये मार्क कमी पडले होते, त्यामुळं तो नैराश्यात गेला, असावा असा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
गावी जाण्याची तिकीट काढलं पण..: विद्यार्थ्यांनं वसतिगृहच्या खोलीत आत्महत्या केली आहे. दिव्यांशुनं इतके टोकाचे पाऊल का उचललं असावं, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे दिव्यांशुनं गावी जाण्यासाठी तिकीट देखील काढलं होतं. त्याची ट्रेन दोन दिवसानंतरची असल्यानं त्यानं वसतिगृहात दोन दिवस अतिरिक्त राहण्याची परवानगी मागितली होती.
व्हीएनआयटीकडून दुःख व्यक्त : आमच्या शिक्षण संस्थेतील एका अत्यंत दुःखद घटनेबद्दल आपल्याला कळवताना आम्हाला खेद होत आहे. दिव्यांशु गौतम बी.टेक.च्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. दिव्यांशु हा मूळचा बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील आहे. स्थानिक पोलीस सध्या या हृदयद्रावक घटनेच्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कसून तपास करत आहेत. दिव्यांशुचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. आम्ही दिव्यांशुच्या पालकांनाही या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आहे.
हे वाचलंत का :