छत्रपती संभाजीनगर Aurangabad Lok Sabha Result 2024 : महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यात मराठवाड्यात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर सर्व मतदार संघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळं जालना-बीड मतदारसंघांमध्ये भाजपाच्या दोन दिग्गज नेत्यांना धक्का बसलाय. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसंच बीडमध्ये पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागली. या दोन हक्काच्या जागा गेल्यानं जातीय समीकरण आडवं आल्याचं बोललं जात आहे. तर, याच समीकरणाचा फायदा मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव विजयी उमेदवार संदीपान भुमरे यांना झाल्याचं देखील पाहायला मिळालं.
आरक्षणाच्या आंदोलनामुळं बदललं समीकरण : गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी उठवलेलं रान निकालाच्या समीकरणावर परिणामकारक दिसून आलं. गेल्या काही महिन्यांमध्ये राजकीय नेत्यांना केलेली गाव बंदी, जाहीर कार्यक्रमात नेत्यांना सहभाग न करून घेण्याचं आवाहन, अशा काही गोष्टींमुळं प्रचारावर मोठा परिणाम पाहायला मिळाला. तर, दुसरीकडं राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू असताना अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजपा-शिवसेना तसंच अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना अडवण्यात आलं, काही ठिकाणी वादही झाले. मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर विरोध कोणाचा केला नाही. मात्र ज्याला पाडायचं त्याला पाडा आपल्या विरोधात काम करणाऱ्याला सोडू नका, असं आवाहन देखील केलं होतं. अशा परिस्थितीत मराठा समाज विशेषतः मराठवाड्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाईल, असं समीकरण मांडण्यात आलं. त्याचा परिणाम जालना-बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला. त्यामुळंच केंद्रीय मंत्री असताना देखील रावसाहेब दानवे यांना धक्कादायक निकालाला समोर जावं लागलं, तर पंकजा मुंडे यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघात परिणाम बदलला : मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा परिणाम पाहायला मिळाला. त्यामुळं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल गेला. मात्र, दुसरीकडं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मराठा उमेदवार दिल्यानं परिणाम उलटा पाहायला मिळाला. आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना संदीपान भुमरे यांनी वारंवार जरांगे पाटील यांची घेतलेली भेट, सरकारतर्फे केलेली मध्यस्ती त्यामुळं जरांगे पाटील यांचा भुमरेंना छुपा पाठिंबा मिळाला. त्यामुळं औरंगाबादचं समीकरण बदललं. म्हणूनच कुठलाही अंदाज नसताना संदीपान भुमरे खासदार झाले. त्यामुळं मराठवाड्यातील मराठा आरक्षणामुळं निकालात मोठे बदल पाहायला मिळाले. विधान परिषद निवडणुकीत आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळं त्यावेळी देखील मोठा परिणाम दिसेल हे नक्की.
हे वाचलंत का :
- पराभवाची सगळी जबाबदारी माझी, मला मंत्रिमंडळातून मोकळं करा : देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय? - Devendra Fadnavis On Election Result
- नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची शक्यता; आज दिल्लीत ठरणार रणनीती - Lok Sabha Election Result 2024
- लोकांच्या मनात पंतप्रधान मोदींविरोधात नाराजी; आजच्या बैठकीत सरकार स्थापनेच्या दाव्याबाबत रणनीती ठरवणार : शरद पवारांचा मोठा दावा - Sharad Pawar Press Conference