चंद्रपूर : ख्यातनाम व्यंगचित्रकार, शिल्पकार, लेखक मनोहर सप्रे यांचं निधन झालं. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी चंद्रपूर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मनोहर सप्रे यांनी विविध वृत्तपत्रातून त्यांची व्यंगचित्रे चांगलीच गाजली होती. व्यंगचित्र आणि शिल्पकला क्षेत्रात त्यांचे महत्वाचं योगदान आहे. तर त्यांच्या कला प्रदर्शनाला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी हजेरी लावली होती.
![Manohar Sapre Passes Away](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-12-2024/mh-chd-01-caricaturist-manohar-sapre-demise-7204762_13122024221501_1312f_1734108301_606.jpg)
बुलडाणा जिल्ह्यातील नांदुऱ्यात झाला जन्म : मनोहर सप्रे यांचा जन्म 4 जानेवारी 1933 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा इथं झाला. त्यांच्या पश्चात पत्नी इंदुमती, नितीन आणि मिलिंद ही दोन मुलं, सुना, नातवंडं असा परिवार आहे. शनिवार 14 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. त्यांनी देहदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार त्यांचा देह चंद्रपूर शासकिय महाविद्यालयाला दान दिल्या जाणार आहे. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून शोकसंदेश व्यक्त करण्यात येत आहे.
![Manohar Sapre Passes Away](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-12-2024/mh-chd-01-caricaturist-manohar-sapre-demise-7204762_13122024221501_1312f_1734108301_753.jpg)
मनोहर सप्रे यांचा जीवनप्रवास : मनोहर सप्रे यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा या खेड्यात झाला. मनोहर सप्रे यांनी खासगीरित्या अभ्यास करून नागपूर विद्यापीठाची तत्त्वज्ञान आणि राज्यशास्त्र या दोन विषयात पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर ते चंद्रपूर येथील जनता महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 22 वर्षे प्राध्यापकी केल्यानंतर त्यांनी प्राध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि ते चंद्रपूरला स्थायिक झाले. सप्रे यांचं पहिलं व्यंगचित्र जून 1957 ला प्रसिद्ध झालं. केवळ ध्यास म्हणून व्यंगचित्रनिर्मितीकडं वळलेल्या सप्रे यांनी जराही खंड पडू न देता अक्षरशः हजारो व्यंगचित्रं रेखाटली. सुरुवातीला नागपूर येथील एका मासिकासाठी त्यांनी काम केलं. 1962 पासून 1984 पर्यंतच्या तब्बल 22 वर्षे त्यांनी मुंबईच्या एका दैनिकासाठी व्यंगचित्रकार म्हणून काम केलं. विशेष म्हणजे चंद्रपुरात राहून त्यांनी हा प्रपंच चालविला. तत्कालीन राजकीय-सामाजिक स्थितीवर त्यांनी त्यांच्या कुंचल्यानी केलेली फटकेबाजी खूप गाजली. यानंतर त्यांनी नंतर नागपूरच्या एका दैनिकासाठी आठ ते दहा वर्षे, नागपूरच्या आणि पुण्याच्या वृत्तपत्रासाठी देखील व्यंगचित्रनिर्मिती केली. व्यंगचित्रांबरोबरीनं काष्ठशिल्पांचा छंदही त्यांनी तेवढ्याच मनस्वितेनं जोपासला. मिळतील तेथून सुंदर-सुंदर कलात्मक, दुर्मीळ काष्ठशिल्पं जमा करून त्यांनी संग्रह केला. केवळ भारतातच नव्हे, तर फ्रान्समध्ये सिर्केना आणि अमेरिकेत फिलाडेल्फिया इथं प्रदर्शनं भरवली.
![Manohar Sapre Passes Away](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-12-2024/mh-chd-01-caricaturist-manohar-sapre-demise-7204762_13122024221501_1312f_1734108301_803.jpg)
अनेक आदिवासी मुलांना लावलं पोटापाण्याला : नागपूरच्या दैनिकात त्यांनी मनमौजी या टोपणनावानं लेखन केलं. इतर नियतकालिकांत, दिवाळी अंकांतून अनेक स्फुटं, लेख लिहिले आहेत. व्यंगचित्रकलेवरच्या त्यांच्या लेखांचे 'आलस-कलस', 'फरसाण' आणि 'हसा की!' असे तीन संग्रह प्रकाशित झाले. व्यंगचित्रकाराप्रमाणेच एक अव्वल दर्जाचे 'डिझायनर' आणि काष्ठ-शिल्पकार अशीही त्यांची एक व्यावसायिक ओळख आहे. त्यांच्याकडं अनेकजण ड्रिफ्टवुड, नदीतले गोटे, बांबू, टेराकोटा अशा वस्तूंपासून कलाकृती बनवण्याचं प्रशिक्षण घेऊन गेलेत. चंद्रपूरच्या जंगलातल्या कित्येक आदिवासी मुलांना कलाशिक्षण देऊन त्यांनी पोटापाण्याला लावलं आहे, एवढंच नव्हे, तर त्यांच्या कलाकृती थेट फ्रान्समधल्या प्रदर्शनात मांडल्या आहेत.