कोल्हापूर Kolhapur Vande Bharat Express : कोल्हापूरकरांसाठी बहुप्रतीक्षित असलेली 'वंदे भारत एक्स्प्रेस' कोल्हापुरात दाखल झाली आहे. आठवड्यातून तीनवेळा धावणाऱ्या कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा सोमवार (16 सप्टेंबर) रोजी शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी वंदे भारत एक्सप्रेची चाचणी घेण्यात आली. कोल्हापूर-पुणे या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेसला नेमका किती वेळ लागतो? या मार्गावर अन्य काही अडथळे आहेत का? याची चाचणी घेण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस कोल्हापूर स्थानकावर दाखल होताच कोल्हापूरकराना वंदे भारत एक्सप्रेससोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा : संपूर्णपणे भारतीय बनावटीची वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस कोल्हापूरकरांना मिळावी यासाठी, गेल्या काही वर्षांपासून विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. अखेर अनेक अडचणीवर मात करत कोल्हापूरकरांना पुणे-कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस मंजूर झाली. हुबळी ते पुणे आणि कोल्हापूर ते पुणे अशा दोन स्वतंत्र वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. सोमवारी रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर रेल्वे स्थानकावर गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
वंदे भारत एक्स्प्रेसचं वेळापत्रक : कोल्हापूर-पुणे वंदे भारत दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचेल. पुण्याहून दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दुपारी २:१५ वाजता ही गाडी सुटेल आणि सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी ती कोल्हापूर स्थानकात दाखल होईल. ही एक्सप्रेस मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड आणि सातारा या स्थानकावर थांबणार आहे. कोल्हापूर-पुणे या प्रवासाचे दर चेअर कारसाठी ११६० रुपये, तर एक्झिक्यूटिव्हसाठी २००५ रुपये आकारण्यात येणार आहेत. यामुळं कोल्हापूरकरांची वंदे भारतची प्रतीक्षा संपणार आहे. तर लवकरच कोल्हापूर-मुंबई मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
चाचणी पूर्ण प्रतीक्षा प्रवासाची : या सर्व पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर-पुणे मार्गावर प्रस्तावित वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी पार पडली. आठ डब्यांची अत्याधुनिक भगव्या रंगाची वंदे भारत गाडी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर सकाळी ९:३० च्या सुमारास दाखल झाली. १० वाजून २५ मिनिटांनी पुण्याच्या दिशेने रवाना झाली. ही एक्स्प्रेस हायस्पीड ट्रेन असल्यानं कोल्हापूर ते पुणे दरम्यान नेमका किती वेळ लागतो? याची चाचणी आज घेण्यात आली. यावेळी पुणे मुंबईहून वरिष्ठ अधिकारी इंदुराणी दुबे, ब्रिजेश सिंह, मिलिंद हिरवे, रामदास भिसे, स्टेशन प्रबंधक मेहता आणि रेल्वे सल्लागार समितीचे शिवनाथ बियाणे उपस्थित होते.
हेही वाचा -
- मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणार देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस'; ऑगस्ट महिन्यात होणार चाचणी - Vande Bharat Sleeper Express
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशला देणार 'मोठी भेट' : चार वंदे भारत, पाच जनऔषधी केंद्रासह 'या' प्रकल्पांचा आहे समावेश
- मराठवाड्याला मिळणार पहिली वंदे भारत एक्सप्रेस, पंतप्रधानांच्या हस्ते 30 डिसेंबरला होणार उद्घाटन