अमरावती Vaikhari Yavalikar Photography Exhibition: पुरातत्व शास्त्रात पुण्याच्या डेक्कन कॉलेज येथून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या वैखरी यावलीकर हिच्या छायाचित्रांचं प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीनंतर, आता अमरावती शहरातील विजय राऊत आर्ट गॅलरीमध्ये भरलं आहे. तिच्या या अनोख्या भाव विश्वाचं अनेकांकडून कौतुक होत आहे.
लहानपणी चित्रकलेची आवड : छायाचित्रकार म्हणून आपली ओळख निर्माण करत असणाऱ्या वैखरीला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती. वैखरीचे वडील सुनील यावलीकर हे प्रसिद्ध चित्रकार आहेत. त्यांनी काढलेली चित्रं देखील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये झळकली आहेत. वडील ज्याप्रमाणे चित्र काढायचे ते मी पाहायची. चित्र काढण्याची त्यांची जी दृष्टी होती त्याच दृष्टिकोनातून मी माझ्या मोबाईल कॅमेऱ्यातून फोटो टिपायला लागले असं वैखरी सांगते.
फोटोग्राफीशी कुठलाही संबंध नव्हता. शिक्षण घेत असताना नवीन मोबाईल फोन खरेदी केला. मोबाईल कॅमेऱ्यामधून ऊन, सावलीचे फोटो टिपायला लागले. लोकांचं सहकार्य मिळालं आणि माझ्या फोटोग्राफीला थेट जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये जागा मिळाली - वैखरी सुनील यावलीकर, छायाचित्रकार
ज्यांचे फोटो काढते त्यांना होतो आनंद : पुण्यात आर्किऑलॉजीचं शिक्षण घेत असताना काही वेगळं दिसलं की त्याचा फोटो टिपायचे. जुन्या वाड्यात खिडकीत बसलेले आजोबा, रस्त्याच्या कडेला रडणारे बाळ असे फोटो टिपल्यावर मी त्यांनाच त्यांचे फोटो दाखवायचे. तेव्हा त्यांना फोटो पाहून आनंद व्हायचा. त्यांच्या या आनंदातूनच मला प्रेरणा मिळत गेली. एका आजीला तर मी टिपलेला फोटो पाहून इतका आनंद झाला की, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला, असे मस्त अनुभव फोटो काढताना आल्याचं वैखरी सांगते.
पेंटिंग सारखे भासतात फोटो : वैखरीने टिपलेल्या सर्वच छायाचित्रांची मांडणी ही थोडीशी हटके आहे. यामुळंच तिने काढलेला फोटो हा पेंटिंगसारखा भासतो, असं बॉम्बे आर्ट गॅलरीचे माजी अध्यक्ष विजय राऊत यांनी म्हटलंय. कमी वयात एखाद्या विषयाची इतकी जाण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी काही निसर्गाचे फोटो आहेत, मात्र हे फोटो पाहताना जणू ते रेखाटले आहेत असा भास होतो. वास्तवात हे रेखाटन नसून तिने तिच्या कॅमेरालाच डोळा केला आणि त्या डोळ्यातून आपल्याला ती जग दाखवते. तिच्या फोटोमध्ये सुंदर रंगसंगती आहे. भडकपणा कुठेही जाणवत नाही. फोटोची फिगर छोटी असली तरी त्याचा आवाका मात्र फार मोठा असल्याचं विजय राऊत सांगतात.
हेही वाचा -
- अमरावती जिल्ह्यातील पार्डी ग्रामस्थांचा पर्यावरण संवर्धनाचा ध्यास, सरकारकडून ''माझी वसुंधरा अभियान'' पुरस्काराने सन्मान
- गुन्ह्यातील पीडितांच्या मदतीसाठी 'गोट बँक', सहा जिल्ह्यात राबवली जात आहे संकल्पना
- 18 वर्षीय अथर्व ताकपिरेने 18 हजार रुपयांत केली आठ राज्यात भ्रमंती; घरच्यांचा विश्वास जिंकला आणि निघाला प्रवासाला