पुणे : आपल्या जादुई तबला वादनानं जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे प्रख्यात तबलावादक पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसैन यांचं निधन झालं. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जाकीर हुसैन यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अश्यातच पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र तसेच सवाई गंधर्व महोत्सवाचे आयोजक श्रीनिवास जोशी यांनी देखील पद्मविभूषण उस्ताद जाकीर हुसैन यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. उस्ताद जाकीर हुसैन यांना लहान मुलांशी बोलणं, क्रिकेट पाहणं खूप आवडायचं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
जाकिर हुसैन यांचे वडील अल्लारखा आणि भीमसेन जोशी चांगले मित्र : यावेळी श्रीनिवास जोशी म्हणाले, की "उस्ताद जाकिर हुसैन एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं, हे सर्वानाच माहीत आहे. माझ्या लहान पणापासून विविध कारणांनी त्यांचं वादन ऐकण्याचा मला योग आला. उस्ताद जाकिर हुसैन यांचे वडील अल्लारखा आणि माझे वडील पंडित भीमसेन जोशी हे खूप जवळचे मित्र होते. तेव्हा आपल्या मित्राचा मुलगा म्हणून उस्ताद जाकिर हुसैन यांची ओळख होती. तेव्हा 60 च्या दशकात सवाई गंधर्व पुण्यतिथी म्हणून सवाईची ओळख होती आणि तेव्हा सवाईमध्ये जाकिर हुसैन यांनी बालवयातच वादन केलं होत आणि ते वादन खूप गाजलं. देवानं त्यांच्या हाताला एक दैवी टोन दिला होता आणि तबल्याची ज्यांना शास्त्रीय ज्ञान नाही, अश्या लोकांपर्यंत देखील ते पोहचले होते. तबल्याचं सादरीकरण कश्या पद्धतीनं करण्यात यावं, हे त्यांनी विविध सादरीकरणाच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे, असं यावेळी श्रीनिवास जोशी म्हणाले.
लहान मुलांशी बोलायला अन् क्रिकेट बघायला खूप आवडायचं : माझ्या लहानपणी देखील मला त्यांना भेटायचा योग आला. आमच्या घरी देखील बऱ्याच वेळी ते जेवायला आले. लहान मुलांशी बोलायची त्यांना खूप आवड होती. लहान मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी बोलणं, गप्पा मारणं त्यांना खूप आवडतं होतं. 2004 साली ठाण्यात एक कार्यक्रम झाला. तेव्हा माझ्या वडिलांची साथ जाकीर हुसैन यांनी दिली आणि त्यांच्या तंबुर्यावर मी देखील होतो. अनेकवेळा माझा त्यांच्याशी फोनवर संवाद होत होता. तबल्याच्या पलीकडं असलेला माणूस म्हणून त्यांची ओळख होती. तसेच त्यांना क्रिकेट बघायला देखील खूप आवडत होतं. एकदा आमच्या इथं आले असताना त्यांनी भारताची मॅच देखील पाहली होती. तब्बल 30 ते 40 वर्ष उस्ताद जाकीर हुसैन यांनी सवाई गंधर्व महोत्सवात वादन केलं. तीन दिवस ते थांबून राहायचे," अश्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिलं.
हेही वाचा :