अहमदनगर Ahmednagar Gold Theft Case : सेवानिवृत्त जलसंधारण अधिकाऱ्याचं घर फोडून चोरट्यांनी तब्बल चौदा तोळं सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना संगमनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या घुलेवाडीतील बालाजी नगर इथं मंगळवारी पहाटे घडली. दिंगबर देव्हारे असं त्या घर फोडण्यात आलेल्या सेवानिवृत्त जलसंधारण अधिकाऱ्याचं नाव आहे.
देवदर्शनासाठी कुटुंब गेल्यानं घर होतं बंद : याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिंगबर देव्हारे हे बालाजीनगर- घुलेवाडी इथं राहात आहेत. ते कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करुन पुन्हा मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ते घरी आले होते. यावेळी त्यांना बंद घराचा कडीकोंडा तोडलेल्या अवस्थेत दिसल्यानं ते घाबरुन गेले. यावेळी त्यांनी घरात जावून पाहिले असता कपाटातील सर्व सामानाची फेकाफेक करण्यात आली होती. कपडे कपाटाबाहेर फेकून दिले होते.
घरातील सर्व दागिन्यांवर चोरट्यानी केला हात साफ : दिंगबर देव्हारे यांनी घरात ठेवलेले 3.50 तोळे वजनाचं एक सोन्याचं लॉकेट, 4 तोळे चार सोन्याच्या बांगड्या, 2.25 तोळे वजनाची सोन्याची माळ, 4 तोळे सोन्याचं गंठण असा असा ऐवज घेऊन अज्ञात चोरट्यानं पोबारा केला आहे. घरातील इतक्या दागिन्यांवर चोरट्यानं हात साफ केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.
मार्च महिन्यात विविध घटनेत 38 तोळे सोन्याचे दागिने लंपास : घरातील सर्व दागिने चोरट्यानं चोरुन नेल्यानं दिंगबर देव्हारे हे घाबरुन गेले. त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी दिंगबर देव्हारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसापासून अज्ञात चोरट्यांनी शहर पोलीस स्टेशन हद्दीत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. एकामागून एक चोरटे सोन्याचे दागिने चोरुन पोबारा करत आहेत. जवळपास मार्च महिन्यात अज्ञात चोरट्यांनी विविध घटनेत 38 तोळे सोन्याचे दागिने चोरुन नेले आहेत. मात्र अध्यापही पोलिसांना चोरट्यांचा शोध लावण्यात यश आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा :