मुंबई Student Suicide Rate Increase : नुकत्याच झालेल्या आयसी थ्री परिषद आणि एक्सपो लॉन्च मध्ये राष्ट्रीय गुन्हे संशोधन विभागानं तयार केलेला एक धक्कादायक अहवाल मांडण्यात आला. यानुसार देशभरातील आत्महत्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीय. यावर्षी देशभरात एक लाख 70 हजार जणांनी आपली जीवन यात्रा संपवली आहे. या संख्येत गेल्यावर्षीच्या तुलनेत 14 टक्के वाढ झाली असून यामध्ये महाराष्ट्रासारखे पुरोगामी राज्य सर्वात पुढं आहे.
कोणत्या राज्यात विद्यार्थ्यांच्या किती आत्महत्या? : महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण अतिशय चिंताजनक आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 1764 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. त्या पाठोपाठ तामिळनाडूमध्ये 1416 विद्यार्थ्यांनी जीवन यात्रा संपवली आहे, तर मध्य प्रदेश मध्ये 1340 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. उत्तर प्रदेशात 160 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून झारखंडमध्ये 824 विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. सन 2021 मध्ये सुद्धा महाराष्ट्रात सर्वाधिक 1834, मध्य प्रदेशात 1308, तामिळनाडूमध्ये 1246 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. महाराष्ट्र खालोखाल झारखंड आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण वाढते आहे. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचं एनसी आरबीनं नमूद केलंय.
समाज माध्यमांवर नियंत्रण आणावं : राज्यातील विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या संदर्भात शिक्षण तज्ञ जयंत जैन यांना विचारले असता ते म्हणाले की, "समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावाचा हा परिणाम आहे. समाज माध्यमांवर सरकारचे काहीही नियंत्रण नाही. त्यामुळं समाज माध्यमांवर अनेक विकृत गोष्टी पोस्ट होत असतात. मुलं त्या पाहतात आणि फॉरवर्ड करत असतात. समाज माध्यमांच्या आहारी गेल्यामुळं मुलं खूप भावनिक झाली आहेत. शाळांवरती आणि शाळा व्यवस्थापनावरती कोणत्याही पद्धतीचं बंधन नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांसोबत काही गैरप्रकार घडतात त्याच्यावर कुणाचंही अंकुश नाही. सरकारनं आता सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेतलाय. मात्र, तो सीसीटीव्ही सतत नियंत्रित झाला पाहिजे. अन्यथा घटना घडून गेल्यानंतर त्या घटनेवर चर्चा करण्यात काहीही अर्थ नसतो. अशा गैरप्रकारांना बळी पडलेली मुलं ही आत्महत्येस प्रवृत्त होतात. त्यामुळं याबाबतही सरकारनं नियंत्रण आणलं पाहिजे. एकूणच समाज माध्यमांवर नियंत्रण आणावं. यासाठी आम्ही आता आमच्या संघटनेच्या माध्यमातून जनहित याचिका दाखल करणार आहोत", असंही जैन यांनी सांगितलं.
मुलांना नकार पचवायला शिकवणं गरजेचं : यासंदर्भात ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉक्टर राजेंद्र बर्वे म्हणाले की, "अलीकडच्या काळात समाज माध्यमांवर अनेक गोष्टी येत असतात. यामध्ये अनेक मुलं विविध विषयांवरच्या रील करून टाकत असतात. बाकीच्या विद्यार्थ्यांना अथवा मुला-मुलींना ते एवढे खुश आहेत आणि आपण खुश नाही याची जाणीव होऊन त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. हा न्यूनगंड कित्येकवेळा त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरतो. विद्यार्थ्यांना अलीकडे आई-वडिलांमुळं अनेक गोष्टी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळं एखादी गोष्ट जेव्हा मिळत नाही तेव्हा ती मिळावी, यासाठी विद्यार्थी अट्टाहास करतात. मग त्यांना त्यात अपयश आलं की ते मृत्यूला कवटाळतात. त्यामुळं विद्यार्थ्यांना अपयश पचवायला शिकवलं पाहिजं. असं केलं तरच या घटना कमी होतील." तसंच शिक्षण व्यवस्थेतील काही दोष सुद्धा या आत्महत्यांना कारणीभूत आहेत. त्यामुळं त्याकडंही चौकसपणे पाहिलं पाहिजे. मात्र, अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होणं हे निश्चितच चिंताजनक असल्याचं डॉक्टर बर्वे म्हणाले.
हेही वाचा -