ठाणे : एका बांगलादेशी जोडप्याला भारतात बेकायदा वास्तव्य करत असलेल्या गुन्ह्यात, उल्हासनगर गुन्हे शाखा पथकानं कोळसेवाडी भागातील एका चाळीत सापळा रचून बेड्या ठोकल्या. अंजूरा मोहम्मद कमल हसन आणि तिचा नवरा मोहम्मद कमल हसन असं अटक केलेल्या बांगलादेशी नवरा बायकोची नावं आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक गणेश महादये यांनी दिली.
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : गेल्याच आठवड्यात भिवंडीतील रेडलाईट एरियामधून सहा बांगलादेशी सेक्स वर्कर महिलांना ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकानं अटक केली होती. आज पुन्हा बांगलादेशी जोडप्याला अटक केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी सापळा रचून घेतलं ताब्यात : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंजूरा ही एका बारमध्ये बारर्गल म्हणून काम करत होती. तर तिचा नवरा कमल हसन हा वाहन चालक म्हणून काम करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने १६ डिसेंबर रोजी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागातील एका चाळीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं होतं. त्यांच्याकडं अधिक चौकशी केली असता भारतात येण्यासाठी अधिकृत कागदपत्रं त्यांच्याकडे नव्हती. तसंच या दोघांनी भारतात अनधिकृत पद्धतीनं प्रवेश केल्याचं त्यांनी स्वतः कबूल केलं. त्यामुळं गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई रामदास उगले यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३, ४, विदेशी व्यक्ती अधिनियम १३ १४ (अ ) १४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोघांना अटक केल्याची माहिती, गणेश महादये यांनी दिली.
भिवंडीतूनही सहा बांगलादेशी सेक्स वर्कर महिलांना अटक : गेल्याच आठवड्यात भिवंडी येथील रेडलाईट एरिया म्हणून प्रचलित असलेल्या हनुमान टेकडी परिसरातून, ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष आणि भिवंडी पोलिसांनी कारवाई करून सहा घुसखोर बांगलादेशी महिलांना अटक केली होती. अटक सहा बांगलादेशी महिला या सेक्सवर्करचा व्यवसाय करत असल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलं आहे.
आर्थिक टंचाईमुळं बांगलादेशी नागरिकांचं पलायन : आर्थिक टंचाई, शिक्षणाचा अभाव आणि प्रचंड बेरोजगारी यामुळं बांगलादेशातील नागरिकांवर उपासमारीचं संकट ओढावलं आहे. आर्थिक टंचाईवर मात करण्यासाठी येथील अनेक नागरिक बांगलादेशातून पळ काढून छुप्या मार्गाने भारतात येतात. बांगलादेशी नागरिकांनी भारतात येण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. मात्र, या सर्व शासकीय नियमांना बगल देऊन केवळ दलालाच्या मध्यस्थीने छुप्या आणि अवैध मार्गाने अनेक बांगलादेशी भारतात येतात. याच दलालांच्या मदतीनं पुढे भारतातील विविध कानाकोपऱ्यात वास्तव्य करतात. कामाच्या शोधात आलेले हे बांगलादेशी नागरिक बहुतेक करून राज्यातील मुस्लिम भागांमध्ये राहात असल्याचं पोलीस तपासात उघड झाल्याचं गणेश महादये यांनी सांगितलं.
हेही वाचा -