मुंबई Maharashtra Bandh August 24 : राज्यात वाढत चाललेल्या महिला अत्याचार आणि नुकतेच बदलापूरमध्ये दोन शालेय मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीनं शनिवारी (24 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे. तर या बंदमध्ये राज्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलय. ते मुंबईत बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे : महाराष्ट्र बंद संदर्भात आज (23 ऑगस्ट) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, "बदलापूर आणि राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्याविरोधात उद्याचा हा कडकडीत बंद असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद असेल. बंद दरम्यान दुकाने, रेल्वे, बससेवा बंद ठेवायला हरकत नाही. उद्याचा बंद हा कुठल्याही राजकीय स्वार्थासाठी नाही, तर विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. त्यामुळं ही विकृती तुमच्या घरापर्यंत येऊ न देण्यासाठी उद्याच्या बंदमध्ये महाराष्ट्रातील तमाम जनतेनं सहभागी व्हावं." तसंच हा बंद दुपारी 2 वाजेपर्यंत चालणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
राज्य सरकारवर टोलेबाजी : पुढं ते म्हणाले, "बदलापुरातील संतापजनक घटनेचा आक्रोश आणि उद्रेक आंदोलनातून दिसला. या आवाजाची दखल न्यायालयानेही घेतली. उच्च न्यायालयानं काल राज्य सरकारवर ताशेरे ओढले. सत्ताधारी म्हणतात की, हे आंदोलन राजकीय प्रेरित होतं. मग मी म्हणतो की जनतेच्या आवाजाची न्यायालयानं दखल घेतली. ती पण विरोधकांना प्रेरित होऊन घेतली का? जेव्हा न्यायालयाचे दरवाजे बंद होतात. तेव्हा सरकार काही करत नाही. त्यावेळी जनतेच्या न्यायालयातच न्याय मिळतो आणि तोच जनतेचा आवाज उद्या बंदमधून दिसेल", असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पोलिसांना अटकाव झाला पाहिजे : "बहिणीचं नातं हे केवळ पैशांपुरतं जोडू नका. तर लाडक्या बहिणीची सुरक्षाही महत्त्वाची असते. ती सुरक्षा राज्य सरकारकडून होत नाही. मागील आठ दिवसांपासून राज्यभरात अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. या बातम्या वाचून संतापाचा अक्षरशः कडेलोट होत आहे. बदलापूरमध्ये उद्रेक आणि जनतेचं संतापजनक आंदोलन झालं. यामध्ये 300 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, ज्या पद्धतीनं पोलिसांनी हे प्रकरण हाताळलं. त्यावरून उच्च न्यायालयानं देखील राज्य सरकारसह पोलिसांवर ताशेरे ओढले. आरोपी असल्याप्रमाणे पोलीस आंदोलकांना दोरखंडातून घेऊन जात होते. त्यामुळं पोलिसांवर पहिल्यांदा अटकाव झाला पाहिजे. तसंच आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या. अन्यथा आम्ही भविष्यात रस्त्यावर उतरु", असा इशाराही त्यांनी दिला.
पोलिसांनी आड येऊ नये : "पोलिसांनी बंदच्या आड येऊ नये. या बंदमध्ये सर्व जाती, धर्म, भाषातील सर्वांनी सहभागी व्हावं. अगदी भाजपाच्या लोकांनी देखील या बंदमध्ये सहभागी व्हावं. कारण, त्यांनाही मुलं-बाळ आहेत. या बंदचा जर सरकारनं फज्जा उडवण्याचा प्रयत्न केला. तर दोन-तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही", असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -