पुणे Three Died in Manchar Accident : कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघातात तिघांचा जळून मृत्यू झालाय. ही घटना पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिण बाजूला तीन किलोमीटर अंतरावर भोररवाडी तांबडे मळा या ठिकाणी सकाळच्या सुमारास घडली. या अपघातात टेम्पोचा चालक थोडक्यात बचावला आहे. तर अपघातात मृत पावलेल्यांची नावं अद्याप समजू शकलेली नाहीत. मात्र, हे मृत तरुण खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
असा झाला अपघात : मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे नाशिक महामार्गावर आज (17 फेब्रुवारी) सकाळी एका स्विफ्ट कारमधून तीन तरुण पुणे नाशिक मार्गानं जात होते. यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेनं जाणारा एक कंटेनर (GJ 01 WB 1737) बंद अवस्थेत उभा होता. या कंटेनरला टेम्पो (MH 12 QG 3351) आणि स्विफ्ट कार (MH 15 DT 0295) जाऊन धडकले. टेम्पो आणि कारची ही धडक इतकी भीषण होती की, दोन्हीही गाड्या पुढे असलेल्या कंटेनरला जाऊन धडकल्या. या भीषण अपघातात स्विफ्ट कारनं लागलीच पेट घेतला होता. स्विफ्ट गाडीतील तिघांना गाडीच्या बाहेर पडता न आल्यानं त्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
जखमींना केलं रुग्णालयात दाखल : घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक आणि मंचर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे अधिकारीदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे खाक झालेली होती. जखमीला तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मिळून चारचाकीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आल. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना दिले जाणार आहेत. तर टेम्पो आणि कारच्या या भीषण अपघातामुळं पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अथक प्रयत्न केल्यानंतर मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
हेही वाचा -