छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Rajshree Umbere - मराठवाड्यातील मराठा युवकांना आरक्षणाची गरज असल्याने हैदराबाद गॅजेट लागू करा या मागणीसाठी क्रांतीचौक भागात उपोषण सुरुवात करण्यात आलं आहे. उपोषण ठिकाणी रविवारी सरकारचे शिष्ट मंडळ चर्चेसाठी येणार असून जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत, उपोषण सुरूच राहील असा इशारा आंदोलक राजश्री उंबरे यांनी दिला आहे. सरकार वेळकाढूपणा करत आहे. तसंच सरकार सकारात्मक असल्याचं सांगण्यात येत असलं तरी अद्याप निर्णय नाही. प्रसारमाध्यमांसमोर त्यांनी निर्णय जाहीर करून आम्हाला लेखी द्यावं, तोपर्यंत माघार नाही. 17 सप्टेंबर पर्यंत निर्णय झाला नाही तर, 18 सप्टेंबर रोजी प्राणत्यागणा असल्याचा इशारा राजश्री उंबरे यांनी दिला.
आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ मुंबईत - हैदराबाद संस्थानात असताना मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत होता. मात्र कालांतराने हा सर्व भाग भारतात समाविष्ट झाल्यानंतर मात्र नियम बदलले गेले आणि समाजाला असणारं आरक्षण संपुष्टात आलं. त्यामुळे हैदराबाद गॅजेट पुन्हा लागू करा, या मागणीसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या प्रदेश अध्यक्षा राजश्री उंबरे यांनी उपोषण सुरू केलं आहे. हैदराबाद गॅझेट लागू करा यासह 21 मागण्यांसाठी 12 दिवसांपूर्वी त्यांचं उपोषण सुरू आहे. आता १७ सप्टेंबर पर्यंत निर्णय न घेतल्यास प्राण त्यागणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलकांचं शिष्टमंडळ शुक्रवारी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलं. यामध्ये पक्ष संघटनेचे प्रमुख आव्हारे पाटील, रवींद्र बनसोड, किशोर चव्हाण यांनी हैदराबाद गॅझेट विषयी चर्चा केली. त्यावर रविवारी सरकारतर्फे शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचं शिष्टमंडळ उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ असं आश्वासन दिल्याचं संघटनेचे प्रवक्ते प्रवीण नागरे यांनी सांगितलं.
प्रसार माध्यमांपुढे जाहीर करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वर्षा बंगल्यात आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आंदोलकांनी सांगितलं. मात्र सरकार या माध्यमातून वेळकाढूपणा करत आहे. त्यांनी आपला निर्णय प्रसिद्धी माध्यमांसमोर जाहीर करावा, जो काही निर्णय असेल तो आम्हाला लिखित स्वरूपात हवा आहे. सरकारवर विश्वास असता तर बारा दिवस उपोषणाला बसावं लागलं नसतं अशी खंत उपोषणकर्त्या राजश्री उंबरे यांनी व्यक्त केली. आंदोलन करत असताना माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र माझ्या वैयक्तिक आयुष्यावर न जाता युवकांसाठी साथ द्यावी. जरांगे पाटील यांच्याबाबत मी काही बोलणार नाही. मात्र 17 सप्टेंबरपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही किंवा त्याबाबत सकारात्मक आश्वासन मिळालं नाही तर 18 सप्टेंबरची पहाट मी पाहणार नाही, असा इशारा राजश्री उंबरे यांनी पुन्हा एकदा दिला आहे. त्यामुळे रविवारी सरकारचे शिष्टमंडळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा..