अकोला Morna river flood : अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी शिवसेना कॉलनीतील सचिन बोके हे चार वर्षाच्या मुलासह राजेश्वर सेतू पुलावर आले होते. पूर पाहताना गाडी घसरल्यानं त्यांचा मुलगा 'जय' थेट वाहत्या नदीच्या पात्रात पडला. वडिलांच्या नजरेसमोर त्यांचा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. मुलाचा शोध घेण्यासाठी आपत्कालीन दल तसंच प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दगडपारवा प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडल्यानं मोर्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
मुलागा गेला वाहून : चार वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांसोबत दुचाकीनं मोर्णा नदीवरील राजराजेश्वर सेतू वरून जात होता. त्यावेळी तो नदीत पडून वाहून गेला. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून पुलावर बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. मुलाचा अद्याप पत्ता लागलेला नाही. जय सचिन बोके असं या चिमुकल्याचं नाव असून तो शिवसेना वसाहत येथील रहिवासी आहे. रात्री अकोला जिल्ह्यातील पातुर तसंच बार्शीटाकळी तालुक्यात दमदार पाऊस झाला. या पावसामुळं अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीला पूर आला आहे. मोर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं जुन्या शहराला नवीन शहराशी जोडणारा राजराजेश्वर सेतू आज सकाळी पाण्याखाली गेला. जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सेतू ओलांडण्यास मनाई केली आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. मात्र सेतुवरील पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी ये-जा सुरू केली. यातच बापलेक सेतुवरून जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या सेतुला कठडे नसल्यानं दुचाकी सेतुच्या काठावर पडली. त्यामुळं मुलागा थेट नदीत पडला. भविष्यात आणखी अशी दुर्दैवी घटना घडू नये, याकरता प्रशासनानं त्वरित कठडे बांधावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या घटनेमुळं पुलावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीमुळं वाहतुकीचा खेळंबा झाला.