ठाणे Woman Booked For Visit Pakistan : बनावट कागदपत्रावर फेक पासपोर्ट बनवून महिलेनं पाकिस्तानचा दौरा केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी या महिलेसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी महिलेला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली. नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान असं बनावट पासपोर्टवर पाकिस्तानचा दौरा करणाऱ्या महिलेचं नाव आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान हिच्यावर 19 जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महिलेनं बनावट कागदपत्रावर बनवला फेक पासपोर्ट : ठाण्याच्या लोकमान्य नगर बस डेपोजवळ असलेल्या एका एजंटकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, तसंच पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक असलेले दस्तावेज बनवून या महिलेनं पासपोर्ट मिळवला. त्याच पासपोर्टवर नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान हिनं पाकिस्तानवारी केली. याबाबतची माहिती वर्तकनगर पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान हिच्यावर गुन्हा दाखल करत तिला अटक केली. बनावट दस्त बनवणाऱ्या व्यक्तीचा शोध वर्तकनगर पोलीस घेत आहेत.
काय आहे नेमकी घटना : सनम खान उर्फ नगमा या 23 वर्षाच्या विवाहित तरुणीनं ठाण्यातून थेट पाकिस्तान गाठलं. त्यासाठी तिने खोटी कागदपत्रं बनवली. त्याच्या सहाय्याने ती पाकिस्तानात पोहोचली. एक महिन्याच्या कालावधीनंतर ती भारतातही परतली. पुन्हा पाकिस्तानला जाण्याची ती तयारी करत होती. मात्र, त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तिला ताब्यात घेतलं. तिची जेव्हा चौकशी करण्यात आली त्यावेळी सर्व माहिती समोर आली. त्यामुळं पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
असा प्रकार आला समोर : सनम खान उर्फ नगमा ही मुळची उत्तर प्रदेशची आहे. तिचं वय 23 वर्ष आहे. तिचं लग्न झालं असून तिला दोन मुली आहेत. पण ती सध्या नवऱ्यापासून विभक्त राहाते. तिची आई ठाण्यात राहाते. उत्तर प्रदेशातून ती थेट तिच्या आईकडे ठाण्याला मुलींसह आली. तिची इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानातल्या बशीर याच्या बरोबर मैत्री झाली. ते दोघे सहा महिने एकमेकांच्या संर्पकात होते. त्यांच्यात प्रेम झालं. त्यानं सनमला पाकिस्तानात येण्यासाठी सांगितलं. त्याच्या बोलवण्यावरून सनम पाकिस्तानला जाण्यास तयार झाली. तिने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास सुरूवात केली आणि तिला एक महिन्याचा व्हिसाही मिळाला. ती तिच्या दोन मुलींसह पाकिस्तानात पोहोचली आणि तिथे तिनं लग्नही केलं. एक महिना ती बशीर बरोबर राहिली. एक महिन्याचा व्हिसा तिच्याकडं होता. शिवाय तिची आईही आजारी होती. त्यामुळं तिने ठाण्याला परतण्याचा निर्णय घेतला आणि ती आईकडे आली. त्यानंतर तिला पुन्हा पाकिस्तानला जायचं होतं. यावेळी मात्र, तिला ठाणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तिची चौकशी केल्यानंतर तिने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. या प्रकरणाची चौकशी आता केंद्रीय यंत्रणा करत आहेत. दरम्यान पोलिस व्हेरिफीकेशनवेळी मोठी चूक झाल्याचंही समोर आलं आहे.
सनम खान उर्फ नगमा ही मुळची उत्तर प्रदेशची आहे. सनमचा पहिला नवरा तिला सतत मारहाण करत होता म्हणून ती सध्या नवऱ्यापासून विभक्त राहाते. ठाण्यात आल्यानंतर ती फेसबुक आणि इंन्स्टाच्या माध्यमातून बशीर नावाच्या पाकिस्तानी तरूणाच्या प्रेमात पडली. बशीरशी तिनं विवाह केला. त्यामुळं तिनं एक महिन्याच्या व्हिसावर तिच्या मुलीसह पाकिस्तानला गेली.आई आजारी पडल्यामुळं ती आता ठाण्यात आली आहे. तिने पुन्हा सहा महिन्यांचा व्हिसा काढला. तिला परत पाकिस्तानला जायाचं आहे. परंतु सनमने पासपोर्ट काढण्यासाठी सर्व खरी कागदपत्रे खरी आहेत.- सनम खान आई
महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास केंद्र सरकारची यंत्रणा करत आहेत. त्यामुळं आम्ही तपासाची माहिती देवू शकत नाही. आमचा तपास पूर्ण झाल्यावर आम्ही याबाबत सर्व माहिती देवू . - अमरसिंग जाधव, पोलीस उपायुक्त
पाकिस्तानचा व्हिसा मागवून केला दौरा : ठाण्याच्या लोकमान्य नगर त्रिमूर्ती अपार्टमेंट इथं नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान ही महिला राहाते. या महिलेनं लोकमान्य नगर बस स्टॉप इथं असलेल्या एका एजंटच्या मदतीनं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट बनवण्यासाठी आवश्यक असलेले बनावट दस्त बनवून पासपोर्ट मिळवला. सदर पासपोर्टद्वारे पाकिस्तानची वारी केल्याचं तपासात उघड झालं. पासपोर्ट बनवण्यासाठी वापरात आणलेले दस्तावेज हे बनावट असल्याचं समोर आलं. आरोपी नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान हिनं पाकिस्तानचा व्हिसा मागवून पाकिस्तान दौरा केल्याचं देखील उघड झालं. याबाबत वर्तक नगर पोलिसांनी आरोपी नगमा नूर मकसूद अली उर्फ सनम खान आणि तिला बनावट दस्त तयार करण्यास मदत करणाऱ्या अनोळखी एजंट अशा दोघांच्या विरोधात वर्तक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. वर्तकनगर पोलिसांनी नगमा हिला बेड्या ठोकल्या आहेत. तर अनोळखी एजंटचा शोध सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.
रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार, ठाणे ते पाकिस्तान कनेक्शन प्रकरणी नगमा नूर उर्फ सनम खान आणि तिच्या आईला वर्तक नगर पोलिसांनी ॲम्बुलन्स गाडीतून मेडिकल चाचणी करण्यासाठी बाहेर काढण्यात आलं. मुलीची तब्बल दहा तास तर आईची पाच तास चौकशी वर्तक नगर पोलिसांनी केलीय.
हेही वाचा -