ठाणे Students ISRO Tour : लहानपणापासून आकाशात चंद्र तारे बघत मोठे होत असताना सर्वांनाच त्याची भुरळ पडते. आकाशात दिसणारा चांदोमामा आणि टिमटिमणारे तारे बघण्याची उत्सुकता वाढत्या वयाबरोबर हळूहळू कमी होत जाते. परंतु काही मुलांच्या मनात हे आकर्षण कायम राहतं आणि ते चंद्र ताऱ्यांचा अभ्यास करण्याचा ध्यास घेतात. परंतु पुरेशा सुविधा अभावी अनेकांना आपलं स्वप्न भंग होताना आपल्याच डोळ्यांनी पहावं लागतं. परंतु आता एक सुवर्णसंधी लहान मुलांसाठी उपलब्ध झालीय. ठाणे महानगरपालिकेच्या इयत्ता आठवी आणि नववीचे काही विद्यार्थी १९ फेब्रुवारी रोजी एका अभ्यासपूर्ण दौऱ्यासाठी इस्रोला रवाना झाले आहेत. आज विद्यार्थी इस्रोला पोहचणार आहेत.
34 विद्यार्थ्यांना मिळाली इस्रोला भेट देण्याची संधी : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोचं कामकाज कसं चालतं ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी या मुलांना उपलब्ध झालीय. खगोल अभ्यास वर्ग उपक्रमा अंतर्गत विज्ञान मंचातील सहभागी विद्यार्थ्यांची खगोल आणि भूगोल या विषयाची स्पर्धा घेण्यात आली होती. या दोन विषयांमधील परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या एकूण 77 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यांना नारायणगाव तालुक्यातील खोडद येथील जीएमआरटी येथे नेण्यात आलं होतं. तेथे पुन्हा छानणी करून 36 जणांची निवड केल्यानंतर त्यापैकी एकूण 34 विद्यार्थ्यांना इस्रोला भेट देण्याची संधी उपलब्ध झालीय. निवड झालेल्या 34 विद्यार्थ्यांमध्ये एकूण 19 मुले आणि 15 मुली आहेत. या 34 विद्यार्थ्यांबरोबरच आठ शिक्षकांनादेखील इस्रोला भेट देण्याची संधी मिळालीय.
विद्यार्थी साधणार संवाद : दौऱ्यादरम्यान हे विद्यार्थी इस्रोच्या अंतराळवीरांशी संवाद साधतील आणि त्यांचे अनुभव जाणून घेतील. अंतराळात रॉकेटचं प्रक्षेपण कसं होतं याची माहिती देखील मुलांना देण्यात येईल. ही संधी आयुष्यात एकदाच मिळते. त्यामुळं मुलांनी याचा पुरेपूर फायदा घेत तेथील शास्त्रज्ञांच्या भेटी आणि मुलाखती घेऊन अंतराळ आणि त्या संबंधित सर्व माहिती नोंद करून घ्यावी. इस्रो मध्ये असलेल्या वस्तू संग्रहालयाला देखील विद्यार्थ्यांनी आवर्जून भेट द्यावी, असा सल्ला देखील ज्येष्ठ खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलाय.
हेही वाचा -