ठाणे : Thane crime : गावाकडील जमिनीच्या वादातून नातेवाईकांमध्ये वाद झाला. या प्रकरणा दोन जणांची हत्या करण्यात आली होती. त्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी नातेवाईकांनी भिवंडीत राहणाऱ्या एका नातेवाइकावर गोळीबार करत त्याची निर्घृण हत्या करत बदला घेतला. याप्रकरणी ऑगस्ट 2020 मध्ये भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत दोन आरोपींना तातडीने अटक केली होती. मात्र, या गुन्हयात युपीचा गँगस्टर सहभागी असून तो गेली चार वर्षांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याचा कसोशीने शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
अटक गँगस्टरनं एकूण पाच हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. वकील उर्फ सानू अब्बास मन्सुरी (रा. फुलपुर, जिल्हा प्रयागराज, उत्तरप्रदेश) असं अटक केलेल्या गँगस्टरचं नाव आहे. तर, अब्दुल सत्तार मोहमद इब्राहिम मन्सुरी (65, रा. गुलजारनगर भिवंडी ) असं गोळ्या झाडून हत्या केलेल्या नातेवाईकाचं नाव आहे
गोळीबार करत केली होती हत्या : उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्ह्यातील फुलपुर येथे मृतक अब्दुल सत्तार यांची शेतजमीन आहे. या जमिनीचा वाद त्याच्या नातेवाईकांसोबत सुरू होतो. याच वादातून उत्तर प्रदेश राज्यातील फुलपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांची हत्या करण्यात आली होती. त्याचा बदला म्हणून अटक आरोपीनं काही नातेवाईकांसोबत संगनमत करून अब्दुल सत्तार यांच्या हत्येचा कट रचला होता. त्यानुसार आरोपी नातेवाईकांनी भिवंडी गाठत गुलजारनगरमध्ये राहणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्यावर ऑगस्ट 2020 रोजी त्यांच्यावर गोळीबार करत त्यांची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी त्यावेळी शांतीनगर पोलीस ठाण्यात सात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली होती.
सापळा रचून बेड्या ठोकल्या : याच प्रकरणात आणखी काही आरोपी अटक केली होती. मात्र, या गुन्ह्यातील खतरनाक गँगस्टर असलेला वकील उर्फ सानू हा गेली चार वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत फरार होता. तो उत्तर प्रदेश राज्यातील प्रयागराज जिल्ह्यातील फुलपुर येथे असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे, पोलीस नाईक श्रीकांत धायगुडे, पोलीस शिफाई, रुपेश जाधव, प्रशांत बर्वे या पोलीस पथकानं स्थानिक फुलपूर पोलिसांच्या मदतीनं कारवाई केली. गॅँगस्टर वकील उर्फ सानू याला त्याच्याच गावात सापळा रचून बेड्या ठोकल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.
हेही वाचा :
3 निलेश राणे यांच्या हॉटेलला महापालिकेनं ठोकलं टाळं, तीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम थकीत