अहमदनगर Sanjay Raut : बिहारचे (Bihar Political Crisis) मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी राजीनामा देऊन भाजपाच्या पाठिंब्यानं पुन्हा सरकार स्थापन केलंय. त्यामुळं विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नितीश कुमार, भाजपावर टीकास्त्र सोडलंय. 'बिहारमधील 'इंडिया' आघाडीतून नितीश कुमार यांना काढून टाकलं तरी, आम्हाला काही फरक पडणार नाही. नितीश कुमार यांचं मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. त्यांनी राजीनामा दिला, हा त्यांचा छंद आहे. अयोध्येला राम आणि बिहारमध्ये पलटूराम आहेत. भाजपा सर्वात मोठा पलटूराम पक्ष आहे,' अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
भुजबळांनी राजीनामा द्यावा : पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना राऊत म्हणाले, 'मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याचं सांगितलं. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गळाभेट घेतली. आता त्यांनी सांगावं की, मराठा समाजाची फसवणूक झाली की नाही. कोणाचंही ओरबाडून मराठ्यांना आरक्षण देऊ नये. मात्र, ओबीसींवर अन्याय होत असल्यानं मंत्री छगन भुजबळ सरकारमध्ये नाराज असतील, तर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं.'
भाजपाला शिवसेनेची भीती : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला का रोखले? भाजपानं आता घाबरू नये, त्यांनी आमच्याशी लढायला हवं. भाजपाला देशात राहुल गांधी तसंच महाराष्ट्रात शिवसेनेची भीती वाटतेय. राहुल गांधींच्या यात्रेवर हल्ले होत असले तरी ते पुढे जात असल्याचंही राऊत म्हणाले.
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतली भेट : अहमदनगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी काळे यांनी खासदार संजय राऊत यांचं काँग्रेसच्या वतीनं स्वागत केलं. यावेळी शहरातील राजकीय गुंडगिरी, तसंच शैक्षणिक संस्थांच्या भूखंडावरील अतिक्रमण, इतर विषयावर सुमारे 20 मिनिटं चर्चा झाली. याबाबतचं सविस्तर पत्र काळे यांनी राऊत यांना दिलं. यावेळी विविध राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी, जिल्ह्यातील महाआघाडीबाबत यावेळी दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाल्याचं काळं यांनी सांगितलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना, किरण काळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शहरातील राजकीय गुंडगिरी, दादागिरीवर जोरदार प्रहार केला.
हे वाचलंत का :