सातारा- पुण्यातील ड्रग्ज प्रकरणात माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंवर हप्तेबाजीचा गंभीर आरोप करण्यात आला होता. त्यावरून देसाईंनी सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
पुण्यातील एफसी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये मुलं ड्रग्जी नशा करतानाचा व्हिडिओ जून महिन्यात समोर आल होता. त्यावरून सुषमा अंधारेंनी तत्कालिन उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंवर हप्तेबाजीचा आरोप करत राजीमान्याची मागणी केली होती. याप्रकरणी देसाईंनी पाटण न्यायालयात अंधारेंवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्या खटल्यामध्ये सुषमा अंधारे शनिवारी (७ डिसेंबर) न्यायालयात हजर झाल्या.
नेमका आरोप काय?- पुण्यात ड्रग्सचा साठा सापडला होता. त्यानंतर पोर्शे कार अपघातातील संशयित अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत दारूची पार्टी केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावरून हॉटेल आणि पबमध्ये अल्पवयीन मुलांना दारू दिली जाते, असा विरोधकांकडून आरोप करण्यात आला. सुषमा अधारेंनी सरकारवर टीका करताना महिन्याला तीन कोटींचा हप्ता गोळा होतो, असा दावा केला. तो हप्ता शंभूराज देसाईंना जातो, असा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकरांनी केला होता. तसेच पैसे घेऊन अनाधिकृत व्यवसायांना बळ दिलं जात असल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंनी शंभूराज देसाईंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
देसाईकडून अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा- शंभूराज देसाई महायुती सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्री असताना पुण्यात ड्रग्जची प्रकरणे उघडकीस आली होती. त्यावरून काँग्रेसचे तत्कालीन आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना (उबाठा गट) नेत्या सुषमा अंधारेंनी देसाईंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर देसाईनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला होता. यासंदर्भात पाटण न्यायालयात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात हजर राहण्याचं समन्स न्यायालयानं अंधारेंना बजावलं होतं. त्यानुसार त्या शनिवारी न्यायालयात हजर झाल्या.
ईव्हीएमच्या कृपेनं महायुती सरकार सत्तेवर- विधानसभा निवडणूक निकालावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, " बॅलेटवर निवडणुका होताना भाजपा बॅकफूटवर जातो. ईव्हीएमवर निवडणूक झाली की भाजपा जिंकतो. राज्यात स्थापन झालेलं सरकार हे जनमतांच्या आशीर्वादानं नव्हे तर ईव्हीएमच्या कृपेनं आलेलं सरकार आहे. या सरकारने मतांची चोरी केली आहे". "अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दोनच दिवसात आयकर विभाग त्यांना क्लीनचीट देउन १ हजार कोटींची मालमत्ता पुन्हा सुपूर्द करतो. याचा अर्थ लोकशाही बळकट करण्यासाठी अजितदादांनी केलेल्या खडतर लढ्याला यश मिळालं, असंच म्हणावं लागेल". असा टोलाही अंधारेंनी लगावला.
हेही वाचा-