नांदेड : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात देखील बनावट औषधींचा साठा उघड झाला आहे. रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेले औषध हे शासनमान्य लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. या तपासणी अहवालात सदरील गोळीमध्ये योग्य प्रमाणात औषधी नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने या औषधींच्या 1 लाख 23 हजार गोळ्या अन्न आणि औषधी प्रशासनाकडं पुढील कारवाईसाठी सुपूर्द केल्या आहेत.
रुग्णाच्या जीविताला धोका नाही : अन्न व औषधी प्रशासनाने अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठलीही कारवाई केली नसल्याचं दिसून येत आहे. पुरवठा झालेल्या गोळ्यांमध्ये योग्य प्रमाणात औषधी नसल्यानं अशा औषधींचं सेवन केल्यावर याचे सकारात्मक परिणाम दिसून येत नाहीत. परंतु रुग्णाच्या जीवविताला धोका होत नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सकांनी सांगितलं.
महाराष्ट्रात नेमकं कोण औषध देत होतं? : ज्या बनावट कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात औषध पुरवठा झाला त्यात ब्रिस्टल फॉम्युलेशन-उत्तराखंड, रिफंट फार्मा-केरळ, कॉम्युलेशन-आंध्र प्रदेश, मेलबॉन बायोसायन्सेस-केरळ आणि एसएमएन लॅब-उत्तराखंड या कंपन्यांचा समावेश होता. तक्रारी नंतर महाराष्ट्राच्या औषध विभागानं संबंधित राज्यांच्या वैद्यकीय यंत्रणांशी संपर्क केला. त्यात मिळालेल्या उत्तरात संबंधित पत्त्यावर अशा कोणत्याही कंपन्याच नसल्याचं समोर आलं. त्यामुळं या कंपन्यांच्या नावानं महाराष्ट्रात नेमकं कोण औषध देत होतं? या मागचे मास्टरमाईंड कोण आहेत? हा प्रश्न अनुत्तरित आहे. माहितीनुसार, धाराशीवला प्रिस्टल कंपनीचा औषधसाठा मिळाला होता.
सॅम्पल तपासणीस पाठवले जातात : "आपल्याकडं दोन प्रकारच्या औषधांचा पुरवठा होतो. एक टेंडरद्वारे करतो आणि दुसरा शासनाकडून होतो. ज्यावेळेस औषध पुरवठा होतो त्यावेळेस कंपनी प्रमाणपत्र देते की, ड्रग्स वापरण्यास योग्य आहे की नाही. त्यानंतर आपण स्वतःहून तपासणीसाठी सॅम्पल पाठवतो आणि त्यानंतर ते वापरण्यास योग्य असल्यास आपण वापरतो. दोन ते तीन महिन्यात एनएबीएलचे रिपोर्ट आल्यानंतर ते आपण वापरात घेतो. फ्यूरियस ड्रग एनएबीएलचा औषध फ्युरियस ड्रग आढळल्यानं अन्न व औषध प्रशासनाला कळवून ते औषध सील करण्यात आले आहे", अशी प्रतिक्रिया जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.
हेही वाचा -