मुंबई Sanjay Raut : नेत्यांवर राज्यात होणारे हल्ले, ईडी कारवाई अशा विषयांवरुन संजय राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. "'लाडकी बहीण योजने'मधून सरकार निवडणुकीपर्यंत दोन महिने पैसे देईल आणि नंतर पळून जातील. लाडक्या बहिणीची काळजी करायला महाविकास आघाडीतील नेते सक्षम आहेत. गद्दार फुटलेले आमदार आहेत, त्यांच्या खात्यात जनतेची लूट केलेले पैसे आहेत. कंत्राटदारांच्या कमिशनमधून यांच्या खात्यात पैसे आले आहेत," असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.
विरोधी पक्ष फार मजबूत : "राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. ते वारंवार सरकारवर टीका करतात. सरकारला आरसा दाखवत आहेत. सरकारला प्रश्न विचारून सळो की पळो करून सोडतायेत. त्यामुळे राहुल गांधी काय, मी काय... किंवा विरोधक आम्हाला पुन्हा एकदा ईडी कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यासाठी आमची तयारी आहे. परंतु, हे आता इतकं सोपं नाही. विरोधी पक्ष फार मजबूत आहे. तुम्ही जरी अल्पमतात आला असला तरी, घटनाबाह्य काम आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हे व्यसन तुमचं सुटत नाही," असं म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला.
सत्ताधारी गुंडांकडून हल्ले : "विरोधकांवर म्हणजे आमच्यावर सत्ताधारी गुंडांकडून हल्ले होऊ शकतात," अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केली. दरम्यान, "हिंदुत्वासाठी मतं मागताय तर एवढे वर्ष तुम्ही काय केलं? भाजपा हा हिंदूंच्या नावावर मतं मागत आहे. भाजपा हा हिंदुचा पक्ष नाही," अशी टीका संजय राऊतांनी भाजपावर केली.
गुंडांची टोळी दिल्लीतून चालते : "राज्यात आमदारांवर होणारे हल्ले हे भ्याड आहेत. प्रत्येकजण आपापले विचार मांडत असतो. पण विचार पटले नाहीत तर विरोध म्हणून हल्ले करायचे, हे चुकीचे आहे. या हल्ल्यावर घटनाबाह्य सरकार काही पावलं उचलत नसेल तर, हे सरकार गुंड टोळ्यांना पोसतंय, असं वाटतंय. या गुंडगिरीचे नियंत्रण दिल्लीतून होतंय, गुजरातमधून होतंय हे स्पष्टपणे दिसतंय. ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम, छोटा शकील, टायगर मेमन हे मुंबईतील अंडरवर्ल्डच्या टोळ्या चालवत होते, त्या पद्धतीने हे सरकार म्हणजे टोळी आहे. या टोळीचे प्रमुख दिल्लीत बसलेले आहेत. आपली सत्ता राखण्यासाठी त्या टोळ्यांना दिल्लीत बसलेले प्रमुख चालवत आहेत. त्या टोळ्या देशात, राज्यात लूटमार, दरोडे, हल्ले करत आहेत," असा हल्लाबोल राऊतांनी राज्य आणि केंद्र सरकारवर केला.