मुंबई Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांच्या पाचव्या टप्प्यात मुंबईसह विविध ठिकाणी मतदान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीत या जागांवरील उमेदवारांबाबत तिढा कायम होता. अखेरीस या जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून शिवसेना शिंदे गटाला या जागा मिळाल्या. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे गटाने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर, उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांच्या विरोधात शिंदे गटानं रवींद्र वायकर यांना उमेदवारी दिली आहे. ठाण्याची जागा शिवसेनेकडं राखण्यात शिंदे गटाला यश आलं असलं, तरी या जागेवरून त्यांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाला मदत? : शिवसेना शिंदे गटाकडून बऱ्याच प्रतीक्षेनंतर उमेदवार जाहीर करण्यात आले. अरविंद सावंत यांचा दक्षिण मुंबई मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी भाजपाची मते अधिक आहेत. तसंच काँग्रेसचीही ताकद या ठिकाणी बऱ्यापैकी आहे. मात्र, असं असताना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यशवंत जाधव आणि यामिनी जाधव यांच्याबाबत सध्या मतदारसंघात चांगलं मत दिसत नाही. त्यांच्याकडं असलेले अनेक कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबतच राहिल्यानं त्या निवडून येण्याची शक्यता नाही, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केलं. तर, उत्तर पश्चिम मतदारसंघातही रवींद्र वायकरांना निवडणूक लढवण्याची इच्छा नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं अमोल कीर्तिकर यांचा मार्ग अधिक सोपा करण्यात आला आहे. ठाण्यामध्ये नरेश मस्के यांच्याबाबत शिवसेना, भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. त्यांना उमेदवारी देणे म्हणजे राजन विचारे यांना निवडून येण्यास मदत करणे, अशीच परिस्थिती असल्याचं जोशी यांनी म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाचे उमेदवार तुल्यबळच : या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार करून उमेदवार जाहीर केले आहेत. त्या त्या मतदारसंघांमध्ये जाहीर केलेल्या उमेदवारांचे काम, त्यांना असलेल्या पाठिंब्यामुळं त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे उमेदवार निश्चितच निवडून येतील, यात शंका नाही, असा दावाही सावंत यांनी केला आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून पालघरची जागा भाजपा मागत असली तरी, अजूनही आमचा या जागेवर दावा कायम आहे. त्यामुळं ही जागासुद्धा आमच्या वाट्याला येईल, असा दावाही सावंत यांनी केला.
हे वाचलंत :
- कुंभनगरी नाशिकमध्ये चार अध्यात्मिक गुरु लोकसभेच्या आखाड्यात; तिघांना लढायचं भाजपाच्या तिकीटावर - lok sabha election
- मोदी-शाहांच्या औरंगजेबाप्रमाणे महाराष्ट्रात स्वाऱ्या; महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊतांची जहरी टीका - Sanjay Raut
- ठरलं तर! मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा 'हुकमी एक्का' लोकसभेच्या रिंगणात - Lok Sabha Election