मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दरवर्षी शिवाजी पार्क येथे दिवाळीत दीपोत्सव साजरा केला जातोय. या दीपोत्सवात मोठी आणि आकर्षक रोषणाई, दिव्यांची झगमगाट आदी पाहायला मिळत आहे. यावर्षी दीपोत्सवाला सिंघम अगेन या सिनेमाच्या टीमनं हजेरी लावली होती. रोहित शेट्टी, अजय देवगण, टायगर श्रॉफ, अर्जुन कपूर हे कलाकारांनी दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला आले होते. यावेळी राज ठाकरेंनी छोटेखानी भाषण केलंय. मात्र या दीपोत्सवामुळे मनसेच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण या दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याचं सांगत खासदार अनिल देसाई यांनी राज्य निवडणूक आयोगाला तक्रार करणारे पत्र लिहिलंय.
पत्रात काय म्हटलंय? : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पत्र पाठवलंय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाली असून, त्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात आदर्श आचारसंहिता लागू आहे. असे असतानाही मुंबई महानगरपालिकेतर्फे मनसेला शिवाजी पार्क या महापालिकेच्या अखत्यारीतील सार्वजनिक स्थळावर निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करून 'दीपोत्सव' साजरा करण्याची परवानगी देण्यात आलीय. तसेच या कार्यक्रमाकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेने पक्षातर्फे सर्वत्र बॅनर, गेट आणि कंदील लावण्यात आलेत. यावर मनसे पक्षाचे चिन्ह दिसत होतं. यामुळे आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली हा सरळसरळ नियमभंग आहे," असं पत्रात नमूद केलंय.
ठाकरेंची उपस्थिती म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन : तसेच या कार्यक्रमाच्या उद्घटनावेळी स्थानिक माहीम विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार अमित ठाकरे यांनी उपस्थिती दर्शविल्यामुळे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. तसेच आयोगाच्या नियमानुसार, शिवाजी पार्कमध्ये विद्युत रोषणाईसाठी केलेला खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात अंतर्भूत करणारी बाब ठरत असल्याने संपूर्ण दीपोत्सवाचा खर्च हा मनसेच्या माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार अनिल देसाईंनी केलीय. तसेच आदर्श आचारसंहिता काळात सार्वजनिक जागांवर पक्षाच्या प्रचारात बेकायदेशीर परवानगी देणाऱ्या महापालिका अधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणीही पत्राद्वारे खासदार अनिल देसाईंनी केलीय.
हेही वाचा -