यवतमाळ MLA ADITYA THACKERAY CRITICIZES BJP : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघासातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुखांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपावर प्रहार केलाय. बहुत हुए खोके-धोखे, अब घर बैठे रोके, अशी टीका त्यांनी महायुतीवर केलीय.
ईडी, सीबीआय भाजपाचे मित्र : ईडी, सीबीआय, आयटी भाजपाचे तीन मित्रपक्ष असल्याचा हल्लबोल देखील आदित्य ठाकरेंनी भाजपावर केलाय. भाजपाची युज अँड थ्रो पॉलिसी आहे. दुसरे पक्ष फोडून भाजपानं मिंध्ये सरकार बनवलं. या सरकारनं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवल्यानं राज्यातील युवकांच्या नोकऱ्या गेल्या. सरकारी पदभरती परीक्षेचे पेपर फुटत आहे. त्यामुळं आपलं सरकार आल्यास पदभरतीचे पेपर फोडणाऱ्यांना फोडून काढेल, असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला आहे. तसंच पेपर फोडणाऱ्यांना कमीतकमी 10 वर्षे शिक्षा झाली पाहिजे, त्याबाबत आमचं सरकार कायदा करेल, असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. सध्याच्या सरकारमधील मंत्रिमंडळात महिलांवर अत्याचार करणारे लोक बसले आहे, अशा शब्दात त्यांनी विद्यामान मंत्री संजय राठोड यांना देखील टोला लगावला.
महायुती सरकार शेतकरी विरोधी : या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील बंडखोर आमदारांवर प्रहार केलाय. महायुतीत गेलेल्या आमदार, खासदारांनी विचार सोडला, जनतेला सोडलं, निष्ठा सोडली. बंडखोरांनी पळून जात दिल्लीत गुडघे टेकले. जनतेला सोडून सत्तेसाठी पळून गेलेल्यांच्या विरोधात नागरिकांनी लोकसभेची निवडणूक हाती घेतल्याचं रोहित पवार यांनी म्हटंल आहे. घराणेशाही, पक्ष फोडून निवडणूक लढवणं लोकांना आवडत नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे.
चित्रा वाघ यांच्यावर टीका : राज्यात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, अशी शपथ मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. पण आज दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्याचे कृषिमंत्री कुठं आहेत? अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केलीय. महायुतीनं संजय राठोड यांना तिकीट दिलंय. त्यामुळं त्यांनी आता चित्रा वाघ यांना प्रचारासाठी बोलवायला हवं असा उपरोधिक टोला रोहित पवारांनी महायुतीला लगावला आहे. तसंच गद्दारांना पोहरागडची देवी आशीर्वाद देणार नाही, अशीही टीका त्यांनी केली. या सभेला आमदार आदित्य ठाकरे, आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, आमदार धीरज लिंगाडे, शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके आदी उपस्थित होते.
हे वाचलंत का :
- नारायण राणेंची पत्रकार परिषद! रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याचे दिले संकेत; उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका - Narayan Rane Press Conference
- अमरावतीत आंबेडकर बंधुची खेळी; 'वंचित'चा आनंदराज यांना बिनशर्त पाठिंबा - LOK SABHA ELECTIONS
- भाजपावर मित्रपक्ष संपवण्याचा आरोप, लोकसभा निवडणुकीत बसणार महायुतीला फटका? - Lok Sabha Elections 2024